शुक्रवार, ३१ डिसेंबर, २०१०

स्वागत...!

माझ्या ब्लॉगर्स मित्र-मैत्रीणीना येणा-या वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा..!

जाणा-या वर्षात बरेच नविन सवंगडी माझ्या फ्रेंड लिस्ट मधे जन्माला आले.....त्या सगळयांचं स्वागत...!
बरेच ब्लॉग वाचले..काहि आवडले..तर काहींचा नुस्ता इमोशनल अत्याचार..

असो..आपण चांगलं बरोबर घेउन जावं....एका मित्राचा ब्लॉग वाचल्यावर आपलाही ब्लॉग असावा..आपणही काहितरी लिहावं, असं वाटलं..म्हणुन ब्लॉग सुरू केला..पण लिहायला वेळच मिळेना..मग योगायोगाने मिळालेल्या सुट्टीचा उपयोग करायचं ठरवलं..आणि मग जवळपास एकाद वर्षानं लिहायला सुरूवात केली..ज्यांनी माझ्या पोस्ट वाचल्या..मला सहन केलं..माझ्या पोस्ट्वर प्रतिक्रिया दिल्या..त्यांचे सगळ्यांचे आभार..!

पहील्यांदा फक्त वाचावं असं वाटलं..ब्लॉग वाचल्यानंतर मलाही काही ब्लॉग आवड्ले...या ब्लॉगर्स जगतातील बापांना माझा सलाम..यांना वाचल्यानंतर जाणवलं... आपण प्रचंड मोठ्या सागरात उडी मारली आहे..इथे फक्त पोहता येउन चालत नाही..रोज नविन सूर मारावे लागतात..या पट्टीच्या पोहणा-यामधे माझा निभाव लागणं कठीण आहे..पण मला खात्री आहे..माझ्या मित्र-मैत्रीणीच्या भेटींचा व प्रतिक्रियांचा ऑक्सिजन मास्क मला नक्किच तारून नेईल...

काही सगळ्यांना आवड्तील असे ब्लॉग मला नमुद केल्याशिवाय राहवलं नाही...त्याच्यांसाठी खास ही पोस्ट..

www.restiscrime.blogspot.com अनघाताई :- लिखाणशैली उत्तम..रोज काहीतरी नविन देण्याचा प्रयत्न..मला अनघाताईची सगळीच बाळं आवड्तात..पण सगळ्यात जास्त आवड्लेलं ते म्हणजे 'सुरंवंट'...वाचल्यानंतर पहील्यांदा माझ्या पाळ्ण्यात झोपलेल्या दोन महीण्यांच्या बाळाकडे लक्ष गेलं..माझं छोटंसं सुरंवंट..

वेदना देउन गेलेली पोस्ट 'आवराआवर' ..बाकी सगळी बाळंही गोडंस...

** पकंज भटक्या..तुझ्या भटकंतीला या भटकभवानी कडून शुभेच्छा!

** www.deepakparulekar.blogspot.com / www.indrayanee.blogspot.com दीपक परुळेकर:- मनाचं बांधकाम आणि इंद्रायणी दोन्हीही छानच..पैलतीर, निशिगंध मस्तच! चगोंच्या चारोळ्या डायरीत लिहणारं पोरंगं मस्त कविता करतय...लगे रहो..

** www.harkatnay.com वटवट सत्यवान तुझे खादाडीचे प्रयोग आवडले आणि तुझी वटवटसुद्धा

** अतुल राणे :-मृगजळ मस्त आहे कवितेच्या विश्वातला राजा..

** www.manatale.wordpress.com अनिकेत :-मराठी भुंगा तुझ्या सगळ्या पोस्ट अप्रतिम..

** www.davbindu.wordpress.com देवेन :-तुझी सध्याची पोस्ट 'पानिपत' खुप आवडली..खरंच पुस्तक वाचताना अंगावर काटा आला होता..

** www.suhasonline.wordpress.com सुहास झेले :-'ओढ नव्या जीवाची' अप्रतिम..

** www.canvaspaint.com सचिन (उथळे) पाटील :- तुझे स्केचस मस्त आहेत...

** www.aadityawrites.blogspot.com आदित्य बोलतोय आणि सगळे वाचत आहेत तुला सुचेल तसं आणि सुचेल ते

** www.gandhchaphyacha.blogspot.com सुषमेय :- चाफ्याचा गंध मस्त पसरलाय...

** www.sanjvel.blogspot.com आ़नंद काळे :- छान आहे ब्लॉग..

** www.arvindcollectionofmarathikavita.blogspot.com /  www.mazidayri.blogspot.com अरविंद अक्षतांचं चांदणं मस्त आहेत तुझ्या कविता आणि तुझी डायरीसुद्धा...!

तुम्ही सर्व खूप छान लिहीता..तुमच्या ब्लॉगशी जोडलेलं हे नातं येणा-या वर्षात अजुन बहरावं हीच प्रार्थना...



नविन वर्षाचं स्वागत जल्लोषात करा..!



२०११ तुझं स्वागत....!

मंगळवार, २८ डिसेंबर, २०१०

ही वाट एकटीची...!!



ही वाट एकटीची...!!

शेजारच्या काकांनी चोरुन केलेल्या स्पर्शासारखी..

माझ्या आवडलेल्या बाहुलीसारखी..

मुलांसोबत न बोलण्याच्या तंबीसारखी..

सारखं आरशात पहायला लावण्यासारखी..


ही वाट एकटीची...!!

त्या प्रेमळ स्पर्शासारखी..

तू सोबत असल्यासारखी..

त्या मोहक भेटींसारखी...

तुझ्या माझ्या प्रेमासारखी...


ही वाट एकटीची...!!

त्या ओघवत्या स्पर्शासारखी...

लग्नातल्या सप्तपदीसारखी...

गळ्यातल्या मंगळसुत्रासारखी...

होमातल्या राखेसारखी..


ही वाट एकटीची...!!

त्या रसरसत्या स्पर्शासारखी..

तुझ्या माझ्या पहिल्या रात्रीसारखी..

अलगद केसात माळलेल्या गज-यासारखी....

पौर्णिमेच्या चंद्रासारखी...



ही वाट एकटीची...!!

वास्तव वणव्याच्या गरम स्पर्शासारखी...

दूर पसरलेल्या स्वप्नांसारखी...

कर्तव्यांच्या सरबराईसारखी...

जबाबदा-यांच्या ओझ्यासारखी..



ही वाट एकटीची...!!

त्या गूढ स्पर्शासारखी..

गर्भात अलगद रुजणा-या बीजासारखी..

दिवसेंदिवस वाढणा-या बाळासारखी..

लेबररुममधल्या प्रसुतीवेदनेसारखी..


ही वाट एकटीची...!!

त्या निरागस स्पर्शासारखी..

स्वतःच्या मुलीच्या पैजंणासारखी..

तीच्या गुलाबी फ्रॉकसारखी..

तीच्या पहील्या बोबडया बोलासारखी..


ही वाट एकटीची...!!

त्या आधार स्पर्शासारखी..

तीच्या वाढत्या वयासारखी..

तीच्या गालावरच्या पहिल्या पिपंलसारखी..

तीने हळूच सांगितलेल्या गुपितांसारखी..


ही वाट एकटीची...!!

त्या आयुष्यभराच्या स्पर्शासारखी..

तीच्या हातातल्या मेहंदीसारखी..

जा मुली जा म्हणण्यासारखी..

त्या ओघळलेल्या अश्रूंसारखी...

दिल्या घरी सुखी राहण्यासारखी...


ही वाट एकटीची...

मनातल्या वादळ्स्पर्शासारखी..

डोळ्यांत लपवलेल्या अश्रूंसारखी..

ओठांवर आणलेल्या खोटया हास्यासारखी...

आपणच एवढी वर्षे आखुन ठेवल्यासारखी...


ही वाट एकटीची...!!

त्या थकलेल्या स्पर्शासारखी..

डोळ्यातल्या मोतीबिंदूसारखी..

डोक्यावरच्या पांढ-या केसासारखी..

फक्त आपल्यासाठी असलेल्या चाकोरीसारखी..


ही वाट एकटीची....फक्त एकटीची....!!!!


बुधवार, १५ डिसेंबर, २०१०

उखळ..!!




''बांधुन ठेवलं ना तासभर..मग बोलशील पोपटासारखा...''

             मी माझ्या तीन वर्षाच्या मुलाचा अभ्यास घेत होते..तो रागाने माझ्याकडे पहायला लागला..

''रागाने काय बघतोस..?..चल आवर उशिर होतोय....स्कुल बस येईल इतक्यात..."

             त्याने रागा रागानेच बॅग भरली..डेरी मिल्कच्या अ‍ॅडमधली मुलगी पळून जाताना रडत रडत आपली बॅग भरते अगदि तश्शी..

               सोसायटीच्या गेटजवळ त्याची स्कुल बस येते .. हॉर्न वाजल्यावर मी त्याला खाली घेऊन येते..आपलं रडणं विसरुन तो आपल्या मित्र- मैत्रिणींच्या घोळ्क्यात शिरतो..बस वळेपर्यंत मी उभी राह्ते..स्वारी नी आमच्याकडे पाहिलंही नाही आज...माझा हात हवेतच राह्तो...जरा जास्तच रूड वागले मी त्याच्याशी...पण कृष्णाची आई सुद्धा त्याला उखळाला बांधुन ठेवत असे..ते त्याला चांगलं वळण लागावं म्हणुनच ना...?

                मी खिन्न मनाने घरी जायला वळणार इतक्यात आमच्या शेजारच्या वींगमधली आर्यनची आई हाक मारते..आर्यन माझ्या मुलाच्याच वर्गातला..तर त्याची आई मला कशी म्हणते, ''कशी झाली परीक्षा पार्थची? माझा आर्यन खूप हूशार आहे हो...सगळं बोलतो पोपटासारखा..ए टू झेड, वन टू टेन, संडे मंडे सुद्धा.." मी मनात म्हटलं..आमच्या कार्ट्याला अजुन गंध नाही लागला अभ्यासाचा...कसंनुसं हसत मी तीला म्हटलं, '' अहो लहान आहे आमचा पार्थ तुमच्या आर्यनपेक्षा..ते पण बरोबर आठ महिण्यांनी...शिकेल हळूहळू बोलायला..'' आता ती कसंनुसं हसली..माझ्याकडे रागाने बघत ती आपल्या घराकडे जायला लागली..तीची नजर जणू मला चिडवत होती...'कोल्ह्याला द्राक्षे आबंटच'...

              जळू मेली...असु दे म्हणूदे काहीतरी..लहान आहे हो माझं तीन वर्षाचं बाळ...शिकेल हळूहळू...
असा विचार करत करत मी घराच्या पाय-या चढत होते..इतक्यात आईचा फोन..

'' गेला का गं पिल्लू शाळेला?"

'' गेला गं बाई..आज किरकिर न करता गेलाय..''

''मारत जाऊ नको गं त्याला..करेल हळूहळू अभ्यास..''

'' अगं मी कुठे मारते त्याला..पण अभ्यास नको का करायला त्याने..थोडं तरी लक्ष हवं... नुस्ती मस्ती..."

'' असु दे गं..शिकेल हळूहळू...तू काय पोटातूनच शिकून आली नव्हतीस...''

'' बरं बरं ठेवते आता फोन..कामं बरीच आहेत मला..."
             
             फोन ठेवला खरं..पण विचार सुरू झाले..मी तरी कुठे पोटातून शिकून आले होते सगळं... हळू ह्ळूच शिकले सगळं..अभ्यासात लक्ष कधी नव्हतंच... नुस्त्या खोडया..आणि मग शिक्षकांनी केलेल्या शिक्षा..मग हळूहळू अक्षराची झालेली ती पुसट्शी ओळख..मैत्रिणीला आपल्यापेक्षा जास्त मिळालेले मार्क्स...किती उपयोगी पडले होते त्यावेळी...ही पुसट्शी ओळख ठळख व्हायला... सगळेच स्वतःची तुलना स्वतःबरोबर का करत नसतील?... नेहमी दुस-यांच्या चष्म्यातून जग बघायची ही आपली सवय कधी जाणार आहे..?

                  काल आपल्या पप्पासोबत 'दबंग' बघता बघता आपल्या पार्श्वभागावर हात ठेउन 'मुन्नी बदनाम..'नाचत होतं पोरगं तेव्हा आपल्याला केवढं कौतुक वाटलं होतं त्याचं..त्याच्या पप्पांनी त्याला उचलून घेतलं आणि त्याच्या गोब-या गालाचा एक मस्त पापा घेतला..मलाही असंचं काहीतरी करावसं वाटलं..पण दुस-याच क्षणी मी त्या दोघांना म्हटलं..
          
 ''चला बंद करा टि.व्ही. आता..अभ्यासाला बस रे आता..एबीसीडी येतं का...?... नाही..'मुन्नी बदनाम' बरं येतं बोलायला..''

             किती मनाच्या विरूद्ध वागले होते मी तेव्हा.. माझ्याच पोटच्या पोरासोबत..
विचांरासोबत माझं काम आणि घड्याळ दोन्हीही वेगाने पुढे सरकत होतं..पार्थची स्कूल बस परतण्याची वेळ झाली होती..मी माझं हातातलं काम आवरून सोसायटीच्या गेटजवळ जाऊन उभी राहीले...पाठीमागुन माझा पदर कुणीतरी खेचल्याची जाणीव होते मला..मी पाठी वळून बघते तर एक शेबंडं पोरगं माझा पदर खेचत असतं..कपडे फाटलेले, अंग कळकटलेलं..पण डोळ्यांत एक वेगळीच चमक..रस्त्याकडे बोट दाखवून काहीतरी दाखवत मला म्हणतं..

'' काकी बघा ना..मला आता एबीसीडी लिहायला यायला लागली..आता आई मला बांधून नाही ठेवणार ना..?

                   त्याच्या त्या निरागस प्रश्नावर काय प्रतिक्रीया देउ ते क्षणभर कळेना मला...त्याने बोट दाखवलेल्या दिशेने मी पाहत राहीले..त्या काळ्याशार डांबरी रस्त्यावर कुठुनश्या सापडलेल्या खडूने त्याने 'एबीसीडी' लिहिली होती..मला त्याचं एवढं कौतुक वाट्लं..त्याक्षणी त्याला उचलून घ्यावं आणि त्याच्या कळकटलेल्या शेबंड्या गालाचा एक मस्त पापा घ्यावा..पण मी त्याला हसुन एवढंच म्हटलं..

'' नाही रे बांधुन ठेवणार तुझी आई तुला.''

                  आताही मनाच्या विरूद्ध वागले होते मी..ते पोरगं हसत हसत आपल्या झोपडीकडे पळालं..आणि पार्थच्या स्कूलबसचा हॉर्न वाजला..मी तिकडे निघाले..

               रात्री स्वप्नात आई माझा अभ्यास घेत होती..आणि मी काळ्याशार डांबरी रस्त्यावर खडूने 'अ आ इ ई' लिहित होते..पण बोलता येत नव्हतं..एकही अक्षर ओळ्खता येतं नव्हतं..तेव्हा आईचा आवाज आला..

 '' उखळाला बांधुन ठेवलं ना तासभर..मग बोलशील पोपटासारखी...''
           
              पण हे सगळं सोडून मला एक प्रश्न विचारावासा वाटतो तो त्या कृष्णाला...


            ''हे कृष्णा, तू चमत्कारांचा राजा...मग हे उखळ गायब का करत नाहीस..?''



मंगळवार, ७ डिसेंबर, २०१०

कथा डायरीची (३)

पण तीचा नंबर कुठे घेतला होता मी..असं का होतंय माझ्याबरोबर..मामांकडुन तिच्या घरचा नंबर तरी मिळावायला हवा..ती बोलेल ना माझ्याबरोबर्..? बी पॉजिटिव्ह मॅन.. नक्की बोलेल..तीला माझ्याशी बोलावचं लागेल..मस्त शक्कल लढवतो..

बायको:

१३.०३.२००४

                  आजचा दिवस थोडा घाईतच गेला..दिवसभर उसंत नव्हती..संध्याकाळी ज्योचा फोन आला आणि कालचा दिवस तसाच्या तसा डोळ्यासमोर उभा राहिला..ती म्हणत होती, " कोण होता गं तो..काल तुमच्या घरी आलेला..टॉल अ‍ॅण्ड हॅण्डसम.."..तसं ज्योला या जगातला प्रत्येक मुलगा हॅण्डसमच वाटतो..ज्यो माझी शेजारीण आणि सख्खी बाल मैत्रिण..तीला बरोबर माहित असतं कि, आमच्या घरी काय काय चाललेलं असतं..तिला मी घरी येईपर्यत चैन पडणार नाही याची जाणिव होती मला..पण पोरगी ऑफिसमधे फोन करेल असं वाटलं नव्हतं...तो मुलगा मला बघायला आला होता म्हट्ल्यावर तीला कसला आनंद झाला म्हणुन सांगु..जसं काय तो तिलाच बघायला आला होता..बॉस बोलावतोय, नंतर फोन करते असं सांगुन मी तीला कटवलं..पण ते कालचं सॅम्पल पुन्हा डोळ्यासमोर आलं..तसा बरा होता मुलगा..पण लग्न करण्याइतपत चांगला आहे कि नाही माहित नाही..तसं पण निनाद नंतर आणखी कोणाचा विचार करण्याइतकी क्षमता माझ्यात राहिली नाही..निनादही सतत मला असं पाहत राहयाचा..
         मी काय पाहतोस रे, असं विचारल्यावर म्ह्णायचा, '' पाहुन घेतो गं तुला..या डोळ्यांत साठवुन घेतोय तुला..उद्या माझे डोळेच रहिले नाहीत तर्''..मी त्याच्या ओठांवर हात ठेवुन म्हणायचे, '' का असं म्हणतोस..तुला माहित आहे ना..तुझे डोळे मला किती आवडतात ते..?''
                  या आठवणींसोबतच ऑफिस मधुन निघाले..घरी जाणारी पावलं गिरगाव बीचकडे कधी वळली माझं मलाच कळलं नाही..आम्ही दोघं ब-याचदा भेटायचो इथे..शांत बसले खूपवेळ, त्या वाळुबरोबर खेळ करत..समोर पसरलेल्या सागराला जाब विचारावासा वाटला,...तुझ्यासमोर बसुन आम्ही आमची स्वप्नं रंगवली होती..तुलाही जमलं नाही कारे त्याला थांबवणं..तुला मित्र म्हणायचा ना तो..मग तू का नाही अडवलंस त्याला..का नाही तुझ्या मैत्रीची शपथ घातलीस..शेवटचं भेटलो होतो आम्ही ते तुझ्याच किनारी..त्याचा हात आपल्या हातात धरुन मी म्ह्ट्लं होतं..''तू माझाच आहेस ना?''

     तो माझ्याकडे बघतच म्हणाला, '' ही शंका कशाला?''

              '' तू पुरुष आहेस म्हणुन..आम्ही मुली तुमच्यावर जीव लावतो..आपलं सर्वस्व तुमच्या हवाली करतो आणि तरी मनात शंका डोकावत राहते..आपण दाखवलेला हा विश्वास अनाठायी तर होणार नाही ना?''

                 त्यानं माझ्या कपाळाचं चुंबन घेतलं आणि म्हणाला, '' मी तुझाच आहे, तुझ्याशिवाय माझं कुणी नाही..या माझ्या मित्राच्या..या निळ्या सागराच्या साक्षीनं सांगतो...मी फक्त तुझाच आहे..''
                  त्यावेळी त्याच्याकडे पाह्ताना वाटलं नव्हतं, ही भेट, आमची शेवटची भेट असेल..घट्ट पकडण्याचा प्रयत्न करताना मुठीतून वाळू निसटून जावी तसा तो निसटून गेला..कायमचा..पण अजुनही कधी कधी पाठीमागुन ''सोनू'' हाक मारल्याचा भास होत असतो मला..मग वेडयासारखं पाठिमागे वळ्ते..त्याला शोधत राहते.. तो परत येण्याच्या सगळ्या शक्यता जवळपास संपल्या होत्या..पण वेडं मन हे स्विकारायला तयार नव्हतं...ज्योच्या फोनने मला परत भानावर आणलं..

        ''अगं तू येतेयस ना घरी..मी आपल्या नेहमीच्या जागेवर वाट बघतेय..लवकर ये..''

             मी ड्रेसवरची वाळू झटकत उठले...घरी जाता जाता कालच्या त्या मुलाबद्दल विचार करत होते..खरं तर ज्योला काय सांगायचं, हा विचार करत होते..तीही पप्पासारखंच म्हणणार..आयुष्यभर अशीच राहणार आहेस का..? खरचं मी अशीच राहणार आहे का..? पण निनादची जागा मी आणखी कोणाला देउ शकेन का?..घरी आल्यानंतर ज्योला खोटंच सांगितलं कि आज ऑफिसमधे खूप काम होतं..माझं डोकं दुखतयं..ती निराश झाली..पण मी तीला उदया या विषयावर चर्चा करण्याचं वचन दिलं..आणि स्वतःची सुटका करुन घेतली..पण आज का माहित का.. निनादसोबत त्या सॅम्पलचाही चेहरा सारखा डोळ्यांसमोर येत होता...उदया बोलेन या विषयावर पप्पांशी..तेच सोडवतील मला या गोधंळातुन..
                                                                                                                                              क्रमशः

शनिवार, ४ डिसेंबर, २०१०

कथा डायरीची (२)

पार्श्वभुमी...

                    या कथेमागचा खरा आनंद अनुभवण्यासाठी या कथेतल्या दोन्ही पात्रांची पार्श्वभुमी जाणुन घेणे गरजेचे आहे..म्हणुन हा पार्श्वभुमी लिहण्याचा अट्टाहास...पार्श्वभुमी लिहितेय म्हटल्यावर कथेतली पात्रं म्हणाली, "आम्हीच सांगतो की, आमची पार्श्वभुमी.." लगेच बायको उताविळपणे म्हणाली, "मी आधी सांगणार..पहिल्या रात्री तुला सांगितलं तसं...". नवरा शांतपणे म्हणाला,''बरं, तसं पण लेडीज फर्स्ट...". तीने लगेच सुरवात केली...

                 "मी आत्ताची सौ. रुचिरा गौरव जोशी, आणि आधीची कुमारी रुचिरा वैभव देशमुख...माझं नाव बदललं नाही गौरवनं...त्याला माझं नाव खुप आवडतं..तर मी मुंबईत जन्मले, वाढले. वाळकेश्वर सारख्या निसर्गरम्य परीसरात राहत होतो आम्ही..त्यामुळे लहानपणीचे संवगडी तसे उच्चभ्रु घरातलेच..आमचं कुटुंब तसं मध्यमवर्गीय आणि त्रिकोणी..म्हणजे मी, आई आणि पप्पा...एकटीच मुलगी असल्यामुळे पप्पांनी खूप लाड केले..हवं ते मिळत गेलं लहानपणापासुन..त्यामुळे स्वभाव थोडाफार हट्टीच...पप्पा तर मला आपला मुलगाच समजायचे..त्यामुळे मी बोल्ड होते ब-यापैकी पण तितकीच बालीशही...घरातल्या कामांचा प्रचंड कंटाळा..वास्तविक आई-पप्पानी कधी सवयच लावली नाही कामाची...मित्र-मैत्रिणी पुष्कळ..खरं तर मित्रच पुष्कळ..मित्र खूप भेटले, पण सखा कुणी भेटला नाही..ज्याची सोबत आयुष्यभर असावी असं वाटेल, ज्याच्यावर जिवापाड प्रेम करावं असं वाटेल..वय वाढेल तसा समंजसपणा वाढत गेला..कॉलेजमध्ये गेल्यावर जगच वेगळं वाटायला लागलं..आणि इथेच माझा प्रेमाचा शोध संपला..पहिल्यांदा प्रेमात पडले..फक्त एवढंच सांगते कि गौरवची ओळख व्हायच्या आधी मी एका मुलाच्या प्रेमात पडले होते..म्हणतात पहिलं प्रेम कधीच विसरता येत नाही..पण तो सोडून गेला, मला एकटीला..आयुष्याच्या अश्या वळणावर..जिथुन एकटीला पुढे जाण्याची भीती वाटायला लागली..तिथेच रेगांळले खूप वेळ..त्याच वळणावर त्याला खूपदा शोधलं पुन्हा पुन्हा.. पुढे काय झालं ते माझी डायरी वाचुन तुम्हांला समजलेच..."
                असं म्हणुन ती आमच्या दोघांच्या तोंडाकडे पाहायला लागली..म्हणाली, ''सगळंच सांगितलं तर माझी डायरी कोण वाचेल..?''
                गौरव तिच्याकडे कौतुकाने पाहायला लागला..खरंच प्रेमात पडणा-या माणसाला सगळयाच गोष्टीचं कौतुक वाटतं..उदया ती साधं शिकंली जरी असती तरी त्याला तिचं कौतुक वाटलं असतं..असो..

                   मी गौरवला म्हटलं, ''आता तु सुरवात कर..''


                  '' मी गौरव पांडुरंग जोशी..आमचंही कुटुंब तसं छोटंसंच..मी, आई, बाबा, आणि माझी मोठी बहीण सुमित्रा..बेळगावमधल्या छोट्याश्या गावात माझा जन्म झाला...दहावी पर्यंतचं शिक्षण तिथलंच.रम्य या शब्दाला पुरुन उरेल असं माझं बालपण..मस्त विहिरीत पोहायचो..मी पोहायलो शिकलो तो मोठा किस्साच आहे..वाचायला मिळेल तुम्हांला, डायरीतल्या कुठल्यातरी पानावर..माझं गाव आणि माझं बालपण...पण, त्यामुळे मुंबईत आल्यावर बावचळलो..डिप्लोमा आणि डिगरी मामांच्या घरी राहुन पूर्ण केलं..खूप मित्र झाले..मुलींना फक्त पाहयाचो पण त्याच्यांबरोबर बोलण्याचं धाडस करू शकलो नाही..मैत्री तर खुप दूरची गोष्ट होती माझ्यासाठी...रूचाला पाहिलं आणि सगळं विसरलो..फक्त ती आणि फक्त तीच..'' मी गौरवला मधेच थांबवत म्हटलं,''अरे तुझ्याबद्दल सांग रे.." गौरव आपल्या गोंधळ्या नावाला सार्थकी लावत थोडासा गोंधळला...थोडा वेळ शांत बसला आणि मग म्हणाला, ''हो हो..मी काय सांगू माझ्याबद्दल? मी रूचा सारखं आणखी कुणाच्या प्रेमात पडलो नाही.. तेवढा वेळच मिळाला नाही..सुमीचं लग्न झालं आणि मी एकटा पडलो..खूप पैसा कमावायाचा आणि मुंबईत स्वतःचं घर घ्यायचं...मग लग्न करायचं असं सगळ्यांचं असतं तसं साधंसं स्वप्न होतं माझं..रूचा माझ्या आयुष्यात आली आणि आयुष्याची ध्येयं, धोरणं बदलून गेली..आता मी फक्त तीला सुखात ठेवण्यासाठी जगतोय...'' मी मनात म्हटलं, याची गाडी पुन्हा एकदा रूचा नावाच्या ट्रॅकवर यायच्या आधी थांबावायला हवी..मी त्याला म्हटलं, '' पुरे आता गौरव, आपण पुन्हा एकदा आपल्या डायरीकडे वळूया..." तो म्हणाला, '' ठिक आहे.."


नवरा:

१३.०३.२००४

                 आज दिवसभर कशातच लक्ष लागत नव्हतं..वाटलं मामांनी तरी फोन करून विचारायला हवं होतं..मामांचा भलताच हट्ट म्हणे कि आपली मुलाकडची बाजू..त्यांना फोन करू दे..माझा इथे जिव जातोय..कुणाला माझी काळजी नाही..सारखी ती माझ्या डोळ्यासमोर येत होती..तीचं ते गोड हसणं..तीला कदाचित हे माहितही नसेल कि तिच्या रेखीव पातळ ओठांवरचा तीळ मला किती बेभान करत होता..तीचे डोळे मला सतत शोधत होते..का मीच तीला शोधत होतो..वेडा झालो आहे मी तिच्यासाठी, तिच्या एका भेटीसाठी...एक फोटो तरी घ्यायला हवा होता तिचा..ती माझ्याबद्दल काय विचार करत असेल..म्हणत असेल काय बावळट मुलगा आहे हा.. नुसता पाहतोय माझ्याकडे..पण तिला जाणिव असावी स्वतःच्या सौंदर्याची...म्हणतात सुंदर मुलींना खूप गर्व असतो स्वतःच्या सौंदर्याचा..पण ही तशी नसावी..आणि असला जरी गर्व तरी त्यात काय गैर आहे...ती आहेच तेव्हढी सुंदर..मामा म्हणत होते, बघ विचार कर मुलीची उंची थोडी कमी वाटते...जाणवलं मला ते..पण तिचा चेहरा पाहिला आणि आणखी काही मला दिसलंच नाही...मगाशी गच्चीत उभा होतो तेव्हा चांदण्यांतून चालत चालत ती माझ्याकडे आली..मी स्तब्ध उभा होतो..हाताची घडी घालून..जणू तीचीच वाट पाहत होतो..ती आली आणि कठडयाला टेकून माझ्या शेजारी उभी राहली..त्या चांदण्यासारखीच मौन.. ह्या गडद पिठूळ चांदण्यानं जादू केली होती... हाताला लागेल का गं हे चांदणं? मी वेडयासारखा हात फिरवून पाहिला..चांदण्याचा स्पर्श होत नाही...ते फक्त जाणवतं..खरं सांगु तर तूही मला जाणवतेस सारखी पण तूझा स्पर्श माझ्या नशिबात आहे कि नाही माहीत नाही...तिला उदया फोन करायचं ठरवलं आहे मनात..
                                                                                
                                                                                                                                                     क्रमशः