गुरुवार, १८ नोव्हेंबर, २०१०

कथा डायरीची...!

प्रस्तावना...

आजपासुन एक गोष्ट सुरु करत आहे...रोज थोडं थोडं लिहेन..
ही कथा आहे एका जोडीची..
डायरीच्या जोडीची...एक डायरी नव-याची आणि दुसरी डायरी बायकोची...
तर सुरवात करुया नव-यापासुन...
नवरा :

१२.०३.२००४
                   आज मी तिला पाहायला गेलो होतो..रीतसर कांदे पोह्याचा कार्यक्रम...तिचे वडील आणि माझे मामा क्लासमेट होते....मला एवढयात तरी लग्न करायचं नव्हतं..पण जावं लागलं..मग आम्ही तिच्या घरी निघालो...तिच्या घराजवळच्या मिठाईवाल्या जवळून मामा मिठाई घेत होते...आणि माझी नजर समोरच्या इमारतीकडे गेली..
              ...खिडकित ती उभी होती..तो चेहरा..खरंच पाहतच राहिलो...एक गोडंस चेहरा, चेह-यावर विलक्षण आत्मविश्वास...इतका वेळ तिच्याकडे पाहणं बरं नाही..मला माझ्याच नजरेची भीती वाटली..मी इतर माणसाकडे बघायला लागलो..ही माणसं कशी असतील? ...मोजणं अशक्यच. पण प्रत्येकजण वेगळा होता......तीच गोष्ट बायकांची..मी प्रत्येकीकडे पाहत होतो.,,,.(तसं नेहमीच पाहतो..) आणि पुन्हा तिच्याकडे पाहत होतो......ब-याचजणी सुंदर होत्या,,,..पण ही वेगळीच होती..किती त-हेचं सौंदर्य असू शकतं?
..ति आकाशात काहितरी पाहत होती..मीही पाहीलं..हिला निर्माण केल्यावर आता  त्या आकाशातल्याजवळ काहितरी उरलं असेल का?
              मामांनी आवाज दिल्यावर मी भानावर आलो..पण तो चेहरा विसरणं शक्य नव्हतं...आजुबाजुला बरेच लोक..काही आपले..काही परके..माझे विचार कुणालाच समजले नव्हते...माणुस किती एकटा असतो हे मला नव्याने जाणवलं...
              मान वळवली तर ती खिडकीतुन गायब...ती हरवली..मी कधीच हरवलो होतो...तिला तिचे व्याप असतील..त्यात मी कुठेही नसेन..मलाही खूप व्याप होते...पण तिला पाहिल्यावर सगळाच विसर पडला...
                मामा म्ह्णाले,'' चल लवकर, ते लोक वाट पाहत असतील..." माझ्या मनाची घालमेल फक्त मीच समजु शकत होतो...कुठेही जाण्याची माझी इच्छा नव्हती...पण आम्ही त्यांच्या घरी गेलो..
                माझं नशीब प्रथमच इतकं जोरावर होतं..कि,...ति खिडकी पण त्यांची आणि ती खिडकीत उभी असणारी मुलगी पण त्यांचीच..ग्रेट मॅन..माझे होणारे सासरे...मी लगेच त्यांना सांगणार होतो, ''मुलगी पसंत आहे मला...जवळचा मुहुर्त बघुन वाजवुन टाकुया.."
पण तिला मी आवडलो की नाही ते कसं कळणार्..म्ह्णतात, मुलगी हसली की फसली...मी तिच्या हसण्याची वाट पहायला लागलो..ती मामांकडे पाहुन हसली..आणि मी सगळं विसरलो...
            मी तिला पहायला आलो आहे, हे तिला माहीत नसावं बहुतेक..तीने साधासा ड्रेस घातला होता..ना मेकअप...ना दागिने..नैसर्गिक सौंदर्याचा अविष्कार होती ती!..माझ्याकडे पाहतही नव्हती ती.. .माझ्या चेह-यावरच्या पिपंल्सना कुठे लपवू असं वाटायला लागलं..ही मला नक्कीच नापसंत करणार...मामा मला हळूच म्हणाले, '' काही विचारायचं तर विचार..''
             मी तिला काय विचारणार होतो..मी वेडा झालो होतो..तिच्यासाठी..तरीही एक प्रश्न विचारला, ''तुमची उंची किती आहे?" तिने चमकून माझ्याकडे पाहिलं..मला काय म्हणायचं आहे हे तिने ओळखलं असावं बहुदा...क्षणभरच माझा वरचा श्वास वरच राहिला.. ही बया अपमान करील का? सौंदर्याचा काय भरवसा? पण ती अगदी मोकळं मोकळं हसली...
आणि मी पुन्हा एकदा सगळं विसरलो...ती हळूच म्ह्णाली, '' एकशे त्रेपन्न सेंटीमिटर''...आणि पुन्हा एकदा गोड हसली..हीला कसं माहित पडलं कि, गणिताचा आणि माझा छत्तीसचा आकडा आहे...मी बराच वेळ इंच, सेंटीमिटर आणि फूट यांचा हिशोब मनातल्या मनात करत होतो...
ब-याच गप्पा झाल्यानंतर तिच्या आईने केलेले कांदा पोहे खाऊन आम्ही निघालो...जड अंत:करणाने तिचा निरोप घेतला...
       कुठ्ल्यातरी पुस्तकात वाचलं होतं..''पोरगी म्हणजे झुळुक..अंगावरून जाते, अमाप सुख देऊन जाते, पण धरून ठेवता येत नाही."
हि झुळूकच होती का ?
होय ! पण ती गेली नव्हती..ती माझ्याभोवती फेर धरून होती. स्पर्शाचा गोफ विणत होती...अमाप सुख देत होती..तितक्याच वेदनाही देत होती..मोरपिसाने कधी ओरखडा उठतो का?
पण तसं घडत होतं..मी तिला कधीच धरुन ठेवू शकणार नव्हतो...वाटलं ति आपल्याला कधीच मिळणार नाही..तिच्यापर्यंत आपले हात कधीच पोहोचणार नाहीत..
घरी आलो...मन उदास, बेचैन, सैरभैर...
बेचैनी कशाची हे समजलं होतं...त्यामुळे बेचैनीमागचं कारण शोधायचा जास्तीचा मनःस्ताप वाचला होता..ती झुळुक मला छळत होती.काय मजा आहे!
आजवर कमी मुली पाहिल्या का? पण सगळ्या तेवढ्यापुरत्या..पाटी पुन्हा कोरी व्हायला वेळ लागत नसे..
आजच ही ओढ का?
जीवघेणी तडफड का?
तहानभूक हरपून जावी, असं का?
ती माझ्यासाठी नाही हे कुठंतरी पटलेलं असताना हा चटका का? ह्या तहानेला काही अर्थ आहे का?
                                                                                                                                क्रमशः

७ टिप्पण्या:

Deepak Parulekar म्हणाले...

छान लिहिलं आहेस !! तिची डायरी वाचायची आहे !! लवकर टाक

सारिका म्हणाले...

धन्यवाद..आजच पुढचा भाग ( तिची डायरी) टाकते...

Anand Kale म्हणाले...

ती हळूच म्ह्णाली, '' एकशे त्रेपन्न सेंटीमिटर''..

हा हा हा...

- असल्या उत्तरांना मुकलेला मी ;-)

सारिका म्हणाले...

आ-का: तुम्हांलाही संधी मिळेल..असं काहीतरी ऐकण्याची..सबर का फल मिठा होता है मेरे दोस्त...

सचिन उथळे-पाटील म्हणाले...

एकदम सही.....
त्याची डायरी मस्त आहे


@आका: वाहिनीना कळवायला हव :)

सारिका म्हणाले...

स पा: धन्यवाद..आज तिची डायरी वाचा..

सारिका म्हणाले...

स पा:आ का चं लग्न झालंय..?