मंगळवार, २८ डिसेंबर, २०१०

ही वाट एकटीची...!!



ही वाट एकटीची...!!

शेजारच्या काकांनी चोरुन केलेल्या स्पर्शासारखी..

माझ्या आवडलेल्या बाहुलीसारखी..

मुलांसोबत न बोलण्याच्या तंबीसारखी..

सारखं आरशात पहायला लावण्यासारखी..


ही वाट एकटीची...!!

त्या प्रेमळ स्पर्शासारखी..

तू सोबत असल्यासारखी..

त्या मोहक भेटींसारखी...

तुझ्या माझ्या प्रेमासारखी...


ही वाट एकटीची...!!

त्या ओघवत्या स्पर्शासारखी...

लग्नातल्या सप्तपदीसारखी...

गळ्यातल्या मंगळसुत्रासारखी...

होमातल्या राखेसारखी..


ही वाट एकटीची...!!

त्या रसरसत्या स्पर्शासारखी..

तुझ्या माझ्या पहिल्या रात्रीसारखी..

अलगद केसात माळलेल्या गज-यासारखी....

पौर्णिमेच्या चंद्रासारखी...



ही वाट एकटीची...!!

वास्तव वणव्याच्या गरम स्पर्शासारखी...

दूर पसरलेल्या स्वप्नांसारखी...

कर्तव्यांच्या सरबराईसारखी...

जबाबदा-यांच्या ओझ्यासारखी..



ही वाट एकटीची...!!

त्या गूढ स्पर्शासारखी..

गर्भात अलगद रुजणा-या बीजासारखी..

दिवसेंदिवस वाढणा-या बाळासारखी..

लेबररुममधल्या प्रसुतीवेदनेसारखी..


ही वाट एकटीची...!!

त्या निरागस स्पर्शासारखी..

स्वतःच्या मुलीच्या पैजंणासारखी..

तीच्या गुलाबी फ्रॉकसारखी..

तीच्या पहील्या बोबडया बोलासारखी..


ही वाट एकटीची...!!

त्या आधार स्पर्शासारखी..

तीच्या वाढत्या वयासारखी..

तीच्या गालावरच्या पहिल्या पिपंलसारखी..

तीने हळूच सांगितलेल्या गुपितांसारखी..


ही वाट एकटीची...!!

त्या आयुष्यभराच्या स्पर्शासारखी..

तीच्या हातातल्या मेहंदीसारखी..

जा मुली जा म्हणण्यासारखी..

त्या ओघळलेल्या अश्रूंसारखी...

दिल्या घरी सुखी राहण्यासारखी...


ही वाट एकटीची...

मनातल्या वादळ्स्पर्शासारखी..

डोळ्यांत लपवलेल्या अश्रूंसारखी..

ओठांवर आणलेल्या खोटया हास्यासारखी...

आपणच एवढी वर्षे आखुन ठेवल्यासारखी...


ही वाट एकटीची...!!

त्या थकलेल्या स्पर्शासारखी..

डोळ्यातल्या मोतीबिंदूसारखी..

डोक्यावरच्या पांढ-या केसासारखी..

फक्त आपल्यासाठी असलेल्या चाकोरीसारखी..


ही वाट एकटीची....फक्त एकटीची....!!!!