बुधवार, २४ नोव्हेंबर, २०१०

व्यथा माझ्या मनातल्या..?


कधी कळतील का रे तुला..

व्यथा माझ्या मनातल्या..?

का वागतोस नेहमी..

माणसांसारखा जगातल्या..

माझे अंतरंग तूच फक्त जाणतोस..

का मग कळत नाहीत भावना मनातल्या..

म्हणतोस खूप प्रेम आहे..

अर्थ तरी कळतो का प्रेमातला..

कधी कळतील का रे तुला..

व्यथा माझ्या मनातल्या..?

रविवार, २१ नोव्हेंबर, २०१०

खेळ नशीबाचा...



अंगणात माझ्या...

सडा पारिजातकाचा..

कधीतरी रंग बदलतो..

आयुष्यातल्या सर्व फुलांचा..

कोण म्हणतं फुलं बोलत नाहीत..

त्यांनाही कधी कधी येत असेल कंटाळा,,,

आपल्याच आयुष्याचा...

मग कोणासमोर मांडतील..

हिशोब आपल्याच वेदनांचा..

कुणाचं प्राक्तन कुणाला चुकलं...

खेळ सगळा आपल्याच नशीबाचा..

कुणी देवाच्या पायावर, तर कुणी तिरडीवर..

तर कुणी चुरगळलेल्या चादरीवर..

खेळ सगळा आपल्याच नशीबाचा..

गुरुवार, १८ नोव्हेंबर, २०१०

कथा डायरीची (१)

बायको:
१२.०३.२००४

                 आजची सकाळ मस्त होती...ब-याच दिवसांनी आज प्रसन्न वाटतं होतं..पप्पांची नुसती घाई चालली होती सकाळपासुन...त्यांचे कोणी मित्र येणार होते घरी त्यांना भेटायला..पप्पांचं हे नेहमीचंच...कुणी येणार म्हटलं कि,  सगळं घर स्वच्छ करत सुटतात....मी मात्र आपल्याच धुंदीत होते...सकाळी उशिरा उठले..निवांत ब्रश केला..सकाळचे सगळे विधी आटपल्यानंतर नेहमीसारखी खिडकीत जाऊन उभी राहिले...आज आभाळ अगदी स्वच्छ होतं..मनातले सगळे गोधंळ दूर झाल्यानंतर मन स्वच्छ होतं तसं..तोपर्यंत आईने हाक मारली..."जरा कांदा चिरून देतेस का गं?"...आईचा प्रश्न म्हणजे आदेशच असतो मुळी.. वैतागत मी म्हटलं,'' कशाला?''
               ''अगं, पोहे करायला हवेत..केवढी कामं पडली आहेत बघते आहेस ना तु..मला मेलीला एकटीला करावं लागतं सगळं.." आईचं पुराण कांदा चिरून दिल्याशिवाय संपणार नव्हतं......मी नाईलाजास्तव कांदा चिरायला बसले..आईची बडबड अखंड चालू होती..
             .''नव-याच्या घरी गेल्यावर अशीच वागणार आहेस का? शेण घालतील सासरची मंडळी आमच्या तोडांत...." तिची निरर्थक बडबड ऐकणं भाग आहे... माझ्या आयुष्याचा..(अशा वेळी माझे कान कसे बंद करायचे ते बरोबर कळतं मला)...तोपर्यंत पप्पांचे मित्र आले...त्यांच्या सोबत एक उंच मुलगा..जरा जास्तच उंच..डोळ्यांना चष्मा..चेह-यावर भरपूर पिंपल्स (तारूण्यपिटिका)..कपडे ठिकठाक...बिल्कुल आत्मविश्वास नाही...एकुण काय जरा विचित्रच ध्यान होतं....मी आतुन त्याचं निरीक्षण करत होते...बरंचसं निरीक्षण झाल्यावर मी माझं काम करायला लागले..
               तेवढयात पप्पांनी आवाज दिला..''रुचा, जरा बाहेर येतेस का?" असं सगळ्यांसमोर माझं नाव घेतलेलं मला आवडत नाही..असो..मी बाहेर येत नाही असं बघुन पप्पा म्हणाले, '' अगं बाहेर येतेस का जरा..तुझी ओळख करुन देतो''....पप्पा पण कधी कधी अतीच करतात...सगळ्यांना काय ओळख करुन दयायची...मी वैतागत बाहेर आले..पप्पांनी ओळख करुन दिली..''हे माझे मित्र..अनिकेत पुरानिक..आम्ही एकत्र शाळेत होतो.."
               मला पाहुन मात्र या काकांचा चेहरा पडला..मी उसनं हासू चेह-यावर आणलं... ते ही औपचारीकपणे हसले.. मग पप्पांनी त्याची ओळख करुन दिली..मी त्याचं नाव ऐकण्यासाठी उत्सुक होते..''हा गौरव जोशी..इंजिनिअर आहे..चांगल्या ठिकाणी जॉब आहे..तुलाही जॉबसाठी मदत करेल''
    ...असंच काहितरी सर्वत्र गवतासारखं पसरलेलं 'जोशी' आडनाव असावं याचं...हा माझा अंदाज खरा ठरला...मी त्याच्याकडे पाहत नव्हते...तो वेडा मात्र आल्यापासुन सतत माझ्याकडे पाहत होता..आपण कुठेही पाहत असलो तरी आपल्याकडे कुणीतरी पाहतंय, हे तरुण मुलींना बरोबर समजतं..असल्या नजरांची सवयच असते आम्हाला!...ते काका आपल्या भाच्याच्या कानात काहितरी कुजबुजले...
             थोडया वेळाने त्या वेडयाने मला विचारलं, "तुमची उंची किती आहे?" ...बावळटच आहे जरा हा...स्वतः उंच आहे म्हणुन सगळ्यांना त्यांची उंची विचारुन चिडवतोय कि काय हा..? मी विचारलं का, कि तु कोणती क्रिम लावुन ह्या एवढया तारुण्यपिटिका उगवल्यास त्या?......त्याची थोडीशी मस्करी करायची म्ह्णुन मी हळुच म्हटलं, ''एकशे त्रेपन्न सेंटिमिटर..''    बस म्हणावं आता हिशोब करत......तो थोडासा गोंधळला..पण लगेच त्याच्या चेह-यावरचे भाव पुर्ववत झाले...मग आईने सगळ्यांना पोहे दिले..पोहे मस्त झाले होते...तो गोंधळ्या अजुनही माझ्याचकडे पाहत होता..
                 त्याच्या मामांनी ''आम्ही निघतो'' म्हटलं आणि त्याच्याकडे पाहिलं, तर हा ढिम्म..जागचा हलेना...सगळं विसरल्यासारखा एकाच जागी बसुन होता..मंदच आहे वाटतं..मामानी पुन्हा एकदा आवाज दिल्यावर तो उठला..
               मी आणि पप्पा त्यांना सोडायला खाली बसस्टॉप पर्यत गेलो...परत घरी येताना पप्पांनी विचारलं, ''कसा वाटला मुलगा?'' मी मनात म्हटलं, '' सॅम्पल आहे.." मी गप्प आहे हे बघुन पुन्हा एकदा त्यांनी मला विचारलं, ''कसा वाटला गं मुलगा?''... मी म्हटलं,'' ठिक आहे, जरा जास्तच उंच आहे.." थोडा वेळ शांत राहिल्यानंतर पप्पा म्हणाले, ''तुला बघायला आले होते..ते लोक"...
               अरे कमालच आहे या लोकांची...मी काय प्राणीसंग्रहालयातला प्राणी आहे, मला बघायला यायला..
              मी म्ह्टलं, '' मला बघायला..कशाला?"
             पप्पा म्हणाले, ''अगं लग्न नको करायला तुझं..आयुष्यभर अशीच राहणार आहेस का?"
             मी म्ह्टलं, ''सांड दिसतो तो मुलगा..मला काहि पसंत नाही..मला मुळी लग्नच करायचं नाही..''
               एवढया लवकर लग्न वगैरे करण्याच्या भानगडीत पडणार नाही मी...मला लगेच ती पान परागची जाहिरात आठवली..मुलगी म्हणते..''शादी और तुमसे..कभी नहीं..." तसं मलाही म्हणावसं वाटलं '' लग्न आणि त्या सॅम्पल बरोबर ..कधीच नाही.."
                                                                                                                             (क्रमशः)

कथा डायरीची...!

प्रस्तावना...

आजपासुन एक गोष्ट सुरु करत आहे...रोज थोडं थोडं लिहेन..
ही कथा आहे एका जोडीची..
डायरीच्या जोडीची...एक डायरी नव-याची आणि दुसरी डायरी बायकोची...
तर सुरवात करुया नव-यापासुन...
नवरा :

१२.०३.२००४
                   आज मी तिला पाहायला गेलो होतो..रीतसर कांदे पोह्याचा कार्यक्रम...तिचे वडील आणि माझे मामा क्लासमेट होते....मला एवढयात तरी लग्न करायचं नव्हतं..पण जावं लागलं..मग आम्ही तिच्या घरी निघालो...तिच्या घराजवळच्या मिठाईवाल्या जवळून मामा मिठाई घेत होते...आणि माझी नजर समोरच्या इमारतीकडे गेली..
              ...खिडकित ती उभी होती..तो चेहरा..खरंच पाहतच राहिलो...एक गोडंस चेहरा, चेह-यावर विलक्षण आत्मविश्वास...इतका वेळ तिच्याकडे पाहणं बरं नाही..मला माझ्याच नजरेची भीती वाटली..मी इतर माणसाकडे बघायला लागलो..ही माणसं कशी असतील? ...मोजणं अशक्यच. पण प्रत्येकजण वेगळा होता......तीच गोष्ट बायकांची..मी प्रत्येकीकडे पाहत होतो.,,,.(तसं नेहमीच पाहतो..) आणि पुन्हा तिच्याकडे पाहत होतो......ब-याचजणी सुंदर होत्या,,,..पण ही वेगळीच होती..किती त-हेचं सौंदर्य असू शकतं?
..ति आकाशात काहितरी पाहत होती..मीही पाहीलं..हिला निर्माण केल्यावर आता  त्या आकाशातल्याजवळ काहितरी उरलं असेल का?
              मामांनी आवाज दिल्यावर मी भानावर आलो..पण तो चेहरा विसरणं शक्य नव्हतं...आजुबाजुला बरेच लोक..काही आपले..काही परके..माझे विचार कुणालाच समजले नव्हते...माणुस किती एकटा असतो हे मला नव्याने जाणवलं...
              मान वळवली तर ती खिडकीतुन गायब...ती हरवली..मी कधीच हरवलो होतो...तिला तिचे व्याप असतील..त्यात मी कुठेही नसेन..मलाही खूप व्याप होते...पण तिला पाहिल्यावर सगळाच विसर पडला...
                मामा म्ह्णाले,'' चल लवकर, ते लोक वाट पाहत असतील..." माझ्या मनाची घालमेल फक्त मीच समजु शकत होतो...कुठेही जाण्याची माझी इच्छा नव्हती...पण आम्ही त्यांच्या घरी गेलो..
                माझं नशीब प्रथमच इतकं जोरावर होतं..कि,...ति खिडकी पण त्यांची आणि ती खिडकीत उभी असणारी मुलगी पण त्यांचीच..ग्रेट मॅन..माझे होणारे सासरे...मी लगेच त्यांना सांगणार होतो, ''मुलगी पसंत आहे मला...जवळचा मुहुर्त बघुन वाजवुन टाकुया.."
पण तिला मी आवडलो की नाही ते कसं कळणार्..म्ह्णतात, मुलगी हसली की फसली...मी तिच्या हसण्याची वाट पहायला लागलो..ती मामांकडे पाहुन हसली..आणि मी सगळं विसरलो...
            मी तिला पहायला आलो आहे, हे तिला माहीत नसावं बहुतेक..तीने साधासा ड्रेस घातला होता..ना मेकअप...ना दागिने..नैसर्गिक सौंदर्याचा अविष्कार होती ती!..माझ्याकडे पाहतही नव्हती ती.. .माझ्या चेह-यावरच्या पिपंल्सना कुठे लपवू असं वाटायला लागलं..ही मला नक्कीच नापसंत करणार...मामा मला हळूच म्हणाले, '' काही विचारायचं तर विचार..''
             मी तिला काय विचारणार होतो..मी वेडा झालो होतो..तिच्यासाठी..तरीही एक प्रश्न विचारला, ''तुमची उंची किती आहे?" तिने चमकून माझ्याकडे पाहिलं..मला काय म्हणायचं आहे हे तिने ओळखलं असावं बहुदा...क्षणभरच माझा वरचा श्वास वरच राहिला.. ही बया अपमान करील का? सौंदर्याचा काय भरवसा? पण ती अगदी मोकळं मोकळं हसली...
आणि मी पुन्हा एकदा सगळं विसरलो...ती हळूच म्ह्णाली, '' एकशे त्रेपन्न सेंटीमिटर''...आणि पुन्हा एकदा गोड हसली..हीला कसं माहित पडलं कि, गणिताचा आणि माझा छत्तीसचा आकडा आहे...मी बराच वेळ इंच, सेंटीमिटर आणि फूट यांचा हिशोब मनातल्या मनात करत होतो...
ब-याच गप्पा झाल्यानंतर तिच्या आईने केलेले कांदा पोहे खाऊन आम्ही निघालो...जड अंत:करणाने तिचा निरोप घेतला...
       कुठ्ल्यातरी पुस्तकात वाचलं होतं..''पोरगी म्हणजे झुळुक..अंगावरून जाते, अमाप सुख देऊन जाते, पण धरून ठेवता येत नाही."
हि झुळूकच होती का ?
होय ! पण ती गेली नव्हती..ती माझ्याभोवती फेर धरून होती. स्पर्शाचा गोफ विणत होती...अमाप सुख देत होती..तितक्याच वेदनाही देत होती..मोरपिसाने कधी ओरखडा उठतो का?
पण तसं घडत होतं..मी तिला कधीच धरुन ठेवू शकणार नव्हतो...वाटलं ति आपल्याला कधीच मिळणार नाही..तिच्यापर्यंत आपले हात कधीच पोहोचणार नाहीत..
घरी आलो...मन उदास, बेचैन, सैरभैर...
बेचैनी कशाची हे समजलं होतं...त्यामुळे बेचैनीमागचं कारण शोधायचा जास्तीचा मनःस्ताप वाचला होता..ती झुळुक मला छळत होती.काय मजा आहे!
आजवर कमी मुली पाहिल्या का? पण सगळ्या तेवढ्यापुरत्या..पाटी पुन्हा कोरी व्हायला वेळ लागत नसे..
आजच ही ओढ का?
जीवघेणी तडफड का?
तहानभूक हरपून जावी, असं का?
ती माझ्यासाठी नाही हे कुठंतरी पटलेलं असताना हा चटका का? ह्या तहानेला काही अर्थ आहे का?
                                                                                                                                क्रमशः

कुणीतरी माझे..

                 कुणीतरी माझे, आज माझे राहले नाही....गेले ते दिवस...त्या दिवसांच्या आठवणी फक्त मागे उरल्या आहेत..एकेकाळी चंद्र आणि आम्ही दोघं सोबत फिरत असू, वेळेचं भान विसरून...आज ओळख न देता तो निघून जातो...आणि 'चांदी की दीवार ना तोडी, प्यारभरा दिल तोड दिया' हा अफसोस मात्र सलत राहतो.

''क्या जमाना था कि हम रोज मिला करते थे..
रातभर चांद के हमराह फिरा करते थे..
देखकर अब हमें चुपचाप गुजर जाता है..
कभी उस शख्स को हम प्यार किया करते थे...''

               आजही चंद्र आणि ता-यांच्या सोबतीनं जागणं आणि फिरणं सुरुच आहे..पण एकटीनं..

''हा असा चंद्र अशी रात फिरायासाठी..
तूच नाहीस इथे हात धरायासाठी...''

                रात्र सरते..चंद्रासोबत प्राणही मावळायला लागतो...जगण्याचा जीवघेणा प्रयास मात्र सुरुच राहतो..हा प्रयत्नही शांतपणे करु देत नाहीत ते अवती-भवतीचे लोक..हजार चौकश्या करुन अधिकच हैराण करुन सोडतात....कळत नाही, काय उत्तर द्यावं त्यांना?

''जो पुछ्ता है कोई, सुर्ख क्यों हैं ऑखें..
मैं ऑखे मल के कहती हूँ, रात सो न सकी..
हजार चाहूँ मगर ये न कह सकूगी कभी..
कि रात होने की ख्वाहिश थी और रो न सकी...''