मंगळवार, ७ डिसेंबर, २०१०

कथा डायरीची (३)

पण तीचा नंबर कुठे घेतला होता मी..असं का होतंय माझ्याबरोबर..मामांकडुन तिच्या घरचा नंबर तरी मिळावायला हवा..ती बोलेल ना माझ्याबरोबर्..? बी पॉजिटिव्ह मॅन.. नक्की बोलेल..तीला माझ्याशी बोलावचं लागेल..मस्त शक्कल लढवतो..

बायको:

१३.०३.२००४

                  आजचा दिवस थोडा घाईतच गेला..दिवसभर उसंत नव्हती..संध्याकाळी ज्योचा फोन आला आणि कालचा दिवस तसाच्या तसा डोळ्यासमोर उभा राहिला..ती म्हणत होती, " कोण होता गं तो..काल तुमच्या घरी आलेला..टॉल अ‍ॅण्ड हॅण्डसम.."..तसं ज्योला या जगातला प्रत्येक मुलगा हॅण्डसमच वाटतो..ज्यो माझी शेजारीण आणि सख्खी बाल मैत्रिण..तीला बरोबर माहित असतं कि, आमच्या घरी काय काय चाललेलं असतं..तिला मी घरी येईपर्यत चैन पडणार नाही याची जाणिव होती मला..पण पोरगी ऑफिसमधे फोन करेल असं वाटलं नव्हतं...तो मुलगा मला बघायला आला होता म्हट्ल्यावर तीला कसला आनंद झाला म्हणुन सांगु..जसं काय तो तिलाच बघायला आला होता..बॉस बोलावतोय, नंतर फोन करते असं सांगुन मी तीला कटवलं..पण ते कालचं सॅम्पल पुन्हा डोळ्यासमोर आलं..तसा बरा होता मुलगा..पण लग्न करण्याइतपत चांगला आहे कि नाही माहित नाही..तसं पण निनाद नंतर आणखी कोणाचा विचार करण्याइतकी क्षमता माझ्यात राहिली नाही..निनादही सतत मला असं पाहत राहयाचा..
         मी काय पाहतोस रे, असं विचारल्यावर म्ह्णायचा, '' पाहुन घेतो गं तुला..या डोळ्यांत साठवुन घेतोय तुला..उद्या माझे डोळेच रहिले नाहीत तर्''..मी त्याच्या ओठांवर हात ठेवुन म्हणायचे, '' का असं म्हणतोस..तुला माहित आहे ना..तुझे डोळे मला किती आवडतात ते..?''
                  या आठवणींसोबतच ऑफिस मधुन निघाले..घरी जाणारी पावलं गिरगाव बीचकडे कधी वळली माझं मलाच कळलं नाही..आम्ही दोघं ब-याचदा भेटायचो इथे..शांत बसले खूपवेळ, त्या वाळुबरोबर खेळ करत..समोर पसरलेल्या सागराला जाब विचारावासा वाटला,...तुझ्यासमोर बसुन आम्ही आमची स्वप्नं रंगवली होती..तुलाही जमलं नाही कारे त्याला थांबवणं..तुला मित्र म्हणायचा ना तो..मग तू का नाही अडवलंस त्याला..का नाही तुझ्या मैत्रीची शपथ घातलीस..शेवटचं भेटलो होतो आम्ही ते तुझ्याच किनारी..त्याचा हात आपल्या हातात धरुन मी म्ह्ट्लं होतं..''तू माझाच आहेस ना?''

     तो माझ्याकडे बघतच म्हणाला, '' ही शंका कशाला?''

              '' तू पुरुष आहेस म्हणुन..आम्ही मुली तुमच्यावर जीव लावतो..आपलं सर्वस्व तुमच्या हवाली करतो आणि तरी मनात शंका डोकावत राहते..आपण दाखवलेला हा विश्वास अनाठायी तर होणार नाही ना?''

                 त्यानं माझ्या कपाळाचं चुंबन घेतलं आणि म्हणाला, '' मी तुझाच आहे, तुझ्याशिवाय माझं कुणी नाही..या माझ्या मित्राच्या..या निळ्या सागराच्या साक्षीनं सांगतो...मी फक्त तुझाच आहे..''
                  त्यावेळी त्याच्याकडे पाह्ताना वाटलं नव्हतं, ही भेट, आमची शेवटची भेट असेल..घट्ट पकडण्याचा प्रयत्न करताना मुठीतून वाळू निसटून जावी तसा तो निसटून गेला..कायमचा..पण अजुनही कधी कधी पाठीमागुन ''सोनू'' हाक मारल्याचा भास होत असतो मला..मग वेडयासारखं पाठिमागे वळ्ते..त्याला शोधत राहते.. तो परत येण्याच्या सगळ्या शक्यता जवळपास संपल्या होत्या..पण वेडं मन हे स्विकारायला तयार नव्हतं...ज्योच्या फोनने मला परत भानावर आणलं..

        ''अगं तू येतेयस ना घरी..मी आपल्या नेहमीच्या जागेवर वाट बघतेय..लवकर ये..''

             मी ड्रेसवरची वाळू झटकत उठले...घरी जाता जाता कालच्या त्या मुलाबद्दल विचार करत होते..खरं तर ज्योला काय सांगायचं, हा विचार करत होते..तीही पप्पासारखंच म्हणणार..आयुष्यभर अशीच राहणार आहेस का..? खरचं मी अशीच राहणार आहे का..? पण निनादची जागा मी आणखी कोणाला देउ शकेन का?..घरी आल्यानंतर ज्योला खोटंच सांगितलं कि आज ऑफिसमधे खूप काम होतं..माझं डोकं दुखतयं..ती निराश झाली..पण मी तीला उदया या विषयावर चर्चा करण्याचं वचन दिलं..आणि स्वतःची सुटका करुन घेतली..पण आज का माहित का.. निनादसोबत त्या सॅम्पलचाही चेहरा सारखा डोळ्यांसमोर येत होता...उदया बोलेन या विषयावर पप्पांशी..तेच सोडवतील मला या गोधंळातुन..
                                                                                                                                              क्रमशः