रविवार, २४ जुलै, २०११

एका मनाचे अंतरंग...!!!

'' शुभ प्रभात...''

'' काय गं आज सकाळी सकाळी फोन..''

''आज मी खूप आनंदात आहे...''

''नेहमीसारखं...तूझं ना त्या लहानग्या चिमणीसारंखं आहे बघ...ईच्छा लहान आणि त्या पूर्ण झाल्यावर होणारा आनंद क्षणभंगूर....''

''अगं आज ईच्छाही मोठी होती ...आणि होणारा आनंद एवढा मोठा की तो मला आयुष्यभर पुरवायचा आहे..''

'' असं काय झालंय..?''

''तू घरी आहेस का आज...?"

''हो... नवरा गेलाय पूण्याला...बच्चू गेलाय त्याच्या मामाकडे...सो दिवसभर्.. मी अ‍ॅण्ड माय अ‍ॅनिमेटेड वर्ल्ड वेळ मिळालाच तर बझ्झ आणि माझी शेती...म्हणजे वेळच वेळ आहे.."

''ठीकाय मग ..मी दुपारी येते..''

''चालेल बाय..''

                  अख्खी दुपार टळ्ली तरी बयेचा पत्ता नाही...माझा मात्र विचार करून करून जीव सुखत चालला होता..फक्त तिचाच विचार मनात..तिचाच नाही...तिच्याशी संबधित सगळ्यांचा..मनाचं कवाड उघडलं..आणि पटापटा माणसं बाहेर पडावी तसे रंग बाहेर पडले..क्षणभरासाठी वाटलं..एकमेकांवर आदळतील आता हे..पण नशीब तसं काही झालं नाही..सगळे एका रांगेत जाऊन उभे राहिले..गुलाबी रंग तीचा...काळा रंग त्याचा...आणि पांढरा रंग तिच्या नव-याचा...मग मुलांनीही अनुक्रमे पिवळा आणि निळा रंग वाटून घेतले...गुलाबी रंग स्वतःसारखाच गुलाबी...स्वतःच्याच विश्वात रमणारा आणि असं असुनही दुस-यांत सहज मिसळून जाणारा...पण का इतका थरथरत होता...आनंदाने की दु:खाने...?

                   काळा रंग अंधाराचा...अमावस्येचा...पण तितकाच तेजस्वी.. ह्ट्टी...कुठल्याही रंगात कितीही मिसळायचा ठरवला तरीही स्वतःचं अस्तित्व न सोड्णारा..सगळीकडे आपली छाप सोडणारा...पांढरा रंग प्रकाशाचा...शुभ्र...तेजपुंज...श्रीमंतीचं भोवताली वलय असणारा...सगळ्यात मिसळ्लोय असं वरवर दाखवणारा... नाहीतर मूळ रंगालाही नकळत आपल्याबरोबर घेऊन जाणारा...त्याचं स्वतःचं त्याला आपलं वाट्णारं अस्तित्व धोक्यात आणण्याइतकं त्याच्यात मिसळून जाणारा...पिवळा अणि निळा रंग..आपल्याच विश्वात खेळ्णारे...खोडकर तितकेच निरागस...बाहेरच्या क्रूर रंगाचा अनुभव नसणारे.. निष्पाप...हे सगळे रंग माझ्याभोवती काय करत आहेत..?..कसले खेळ खेळत आहेत हे..?...आता ह्या सगळ्यांनी मधे काहीतरी ठेऊन त्याच्याभोवती फेर धरायला सुरवात केली...काय होतं बरं ते...माझं मन.. माझं हॄदय..माझा मेंदू...काही कळेना...पण मी पूर्णपणे त्या रंगाच्या ताब्यात होते...पाठशिवणीचा खेळ सुरू झाला आता...पांढरा रंग गुलाबी रंगाच्या मागे आणि गुलाबी रंग काळ्या रंगाच्या मागे...आणि काळा रंग कसल्यातरी ध्यानस्थ मुद्रेत...पण तो तिला सापड्त का नव्हता...?...गुलाबी रंग आता आपला मूळ रंग सोडायला लागला...स्वतःचं अस्तित्व जपण्यासाठीची धडपड...पून्हा एकदा तळ्मळ...आणि माझा जीव गुदमरायला लागला...कुणीतरी माझ्या छाताडावर बसुन गळा दाबतंय...मला उंचावरून कुणीतरी फेकुन देतय..मी ओरडतेय...मी जागी झालेय का?...पण मी कुठे आहे..? समोरचे सगळे रंग ह्वेत विरून जातायेत हळुह्ळु...सर्वांग घामानं डबडबलेलं...स्वप्नात होते तर मी...

डोअरबेल वाजतेय.. दुपार झाली वाटतं बयेची...तर दारात पोलिस उभे..

''ह्या बाईला तूम्ही ओळखता...?''

डोळ्यासमोरचा फोटो दिसेनासा झाला...

''ह्या बाईनी ट्रेन मधून उडी मारुन आत्महत्या केलीय..ह्याच्यां मोबाईलवर शेवट्चा कॉल तुमचा होता....''

मला काहीच कळत नव्हतं.....समोर सगळा गुलाबी रंग पसरलेला...स्वतंत्र झालेला....

शेवटी ती आयुष्यभरासाठी सुखी झाली.....