शुक्रवार, १६ डिसेंबर, २०११

माझ्यातली 'मी'.....एक आई....!!

                     माझ्यातल्या 'मी' ला कुठे हरवलेय मी...कौतुकापोटी की गरज म्हणुन...स्वतःवर लादून घेतलेल्या जबाबदा-या, बंधनं...सगळच हसत सहन करत आले मी..मला आवडायचे फुलपाखरांचे रंग...त्याचं उडणं.. हिरव्यागार झाडांचा वास...मातीचा गंध...पण इथे तर फक्त सगळीकडे फोडणीचेच वास...मुलांचा कलकलाट..भांड्याचा गोंधळ...सगळं हवंही होतं आणि नकोहि...चाकोरीबाहेर जाण्याचं मोठं आकर्षण...परंपरा संभाळण्याकडे असलेला कल...डोळ्यांत काजळ घालायचं होतंही आणि ते घातल्यावर आपल्या दृष्टीसीमेला बंधनं घातली जातील कि काय अशी भीतीही वाटत होती...मुक्त वागायचं होतं...स्वैर राहायचं होतं...पण माझ्या मनाला उडता येत नसावं बहुतेक...माझं मन स्वच्छंदी नव्हतं....पण मग कुणाला स्वैर, स्वच्छंदी राहायचं होतं..?
                   
                     सगळ्यांना ओरडून सांगावसं वाटताना कुणीतरी मौनाचं महत्त्व समजावत होता...घुसमट होत होती...श्वास कोंडत होता...पण जाणार कुठे..?
या सगळ्यात एकच गोष्ट मनासारखी...कौतुक्...भरपुर कौतुक...पण आजकाल मन तिथेही संशयी...कौतुक कि नकळत घेतला जाणारा फायदा..?....काहिच कळत नाहि.....
                       

                     मी कोण आहे..?.. नात्यात गुरफटलेली बंदिस्त स्त्री...कि घर आणि ऑफिस संभाळणारी एक स्वतंत्र व्यक्ती...मी नक्की यशस्वी होते...यशस्वी म्हणजे नेमकं काय...त्या टोमण्यापासुन दूर जाणं म्हणजे यश...
मी कोण होते...आणि नेमकी मी काय होते..काहिच कळायला मार्ग नव्हता...लोकांच्या मते मी कुणाच्या बाळाला घ्यायचं नाही...पण का?

                     माझ्यातल्या 'मी' चं माझ्याचबरोबर भांडण...
                    ती म्हणत होती...''उठ...बाहेर पड...धुडकाऊन लाव सगळ्यांना...सगळ्या बंधनांना...मोकळी हो...''
                     मग मी म्हणायचे....'' अगं हे सगळं तूलाच तर हवं होतं...तूच म्हणाली होतीस ...तू सगळं करू शकतेस..मग आता का मागं फिरतेस...एकटी राहू शकतेस का?''
                    इथे तरी काय आहे....मोकळं आकाश...कि नुसताच पोकळ ध्वनी...समोर अंधार...मोकळं, वांझोटं गर्भाशय...सगळं असुन नसल्यासारखं...
                  
                    पण काहितरी दिसतंय...तांबुस गोळा....माझे रीती ओंजळ भरून गेली....
                   
                    पांढ्-या पायाची पोर....जन्मतःच आईला गिळुन टाकलं....
खरंच तीचे पाय पांढरे होते...गोडंस,गुबगुबीत...दुध भरलेल्या फुग्यासारखे...दत्तक घेतला तीने माझा सगळा वांझोटा अंधार....



माझं बाळ...मी पूर्ण झाले होते...

असं दुस-याचं बाळ द्त्तक घेउन कुणी आई होतं का...?

पण माझ्यातलं मातृत्व वांझोटंपण झटकून नव्याने जन्माला आलं होतं...

माझ्यातली मी सापडले होते मलाच....

कोण होते मी....माहित आहे...

एक आई....फक्त आई...



५ टिप्पण्या:

Yogesh म्हणाले...

आई...फ़क्त आई....बस्स..यातच सार काही आलयं.

सुंदर पोस्ट

सारिका म्हणाले...

हो रे या एका शब्दात सगळं विश्व सामावलंय...

धन्यवाद....!!

hemant म्हणाले...

आई होण्याची आंतरिक उर्मी विवाहित स्त्रीला बेचैन करत असते. असह्य वेदना सहन करून ती मातृत्व प्राप्त करते.
.....पण
एकदा आई झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्या बाळाची आई, पुन्हा तिसऱ्या बाळाची आई,
हे कमी आहे कि काय म्हणून मुलगा होत नाही म्हणून मुलगा होई पर्यत पुन्हा पुन्हा आई होणं????
एकदाच आई होणं पुरेसं नाही का?

hemant म्हणाले...

आई होण्याची आंतरिक उर्मी विवाहित स्त्रीला बेचैन करत असते. असह्य वेदना सहन करून ती मातृत्व प्राप्त करते.
.....पण
एकदा आई झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्या बाळाची आई, पुन्हा तिसऱ्या बाळाची आई,
हे कमी आहे कि काय म्हणून मुलगा होत नाही म्हणून मुलगा होई पर्यत पुन्हा पुन्हा आई होणं????
एकदाच आई होणं पुरेसं नाही का?

सारिका म्हणाले...

खरंच पुरेसं आहे....

पण आपला समाज बाळ न होणा-या स्त्रीला जगणं असह्य करतो......

ब-याचदा तीचे घरातलेहि तीला आधार देत नाहित....

प्रतीक्रीयेसाठी धन्यवाद सर...!!!