मंगळवार, २० सप्टेंबर, २०११

वॉशिंग मशिन यात्रा...!!!

                         माझी आई म्हणजे जरा वेडछापच आहे...छोट्या छोट्या गोष्टींसाठी घाबरत असते..मी काय लहान आहे का आता..वर्षांचा होईन थोड्या दिवसांनी..ह्याला हाथ लावू नको..त्याच्यावर चढू नको... हे खाऊ नको...काय आहे यार्...सुखाने जगू देत नाहित हे मोठे लोक.. हि आई तर नुसती किरकिर करत असते...पण प्रेम पण तेवढंच करते माझ्यावर...रात्री तिच्या कुशीत झोपायला खूप खूप आवड्तं मला...ती सकाळी ऑफिसला जाते तेव्हा खूप रडायला येतं मला..सुट्टी असली कि ती खूप खेळते माझ्याबरोबर्...मला ती खूप आवड्ते...मी एखादी नवीन गोष्ट केली कि तीला खूप कौतुक वाट्तं माझं...सतत काहीतरी करायला सांगत असते..भंडावून सोडते अगदी.. नाक कुठे आहे...दात दाखव...'आई' बोल ना... नाचुन दाखव...असं काहीही.....वेडछाप...

                         रविवारी बाबांनी मला सलून मधे नेलं...सलून जिथे एक काका ब-याच काकांचे केस कापत असतात आणि हो दाढी पण करतात..माझेही केस कापले..अक्षरशः गोटाच..पहिल्यांदा आरशात बघायला कसंतरी वाटलं...पण खूप हलकं हलकं वाटत होतं...माझ्या गोट्या रूपाचंहि आईला भारी कौतुक..नेह्मीसारखं भरपूर फोटो काढले....



                            मला "आई" बोलता यायला लागलं त्यादिवशी तर आईने मस्त खीर बनवली होती...आणि दिवसभर मला किती वेळा ''आई'' बोलायला लावलं होतं..अश्या खूप गोष्टी ज्या मला क्षुल्लक वाटतात...त्याचं तीला प्रचंड कौतुक असतं...मला आलेला पहिला दात्...मी म्ह्टलेला पहिला शब्द...मी मागच्या महिण्यातच चालायला लागलो...आई तर इतकी आनंदली (तसं पण तिला ओव्हर रीअ‍ॅक्ट व्हायला काहिहि कारण पुरतं )...तीने त्यादिवशी दही भात आणि शि-याचा नैवेद्य दाखविला बाप्पाला...बाप्पाची मजा आहे बुवा...चालायला लागलो आम्ही...आणि खाऊ मिळाला बाप्पाला...
                        पाय फुटल्यावर पाहिल्यांदा सर केला तो सोफा..उंचीला कमी त्यामुळे सहज चढून गेलो...आई दिवसभर आल्या गेल्याना सांगत होती...'' वर्ष पूर्ण व्हायच्या आतच पाय फुट्ले हो माझ्या बुबुड्याला..''

                           सोफ्यानतंर माझं टार्गेट होतं बेड...बेडवर चढणं तितकसं अवघड नव्ह्तं...कारण आईचं पुस्तकाचं कपाट बेडला जोडलेलं आहे..त्याच्यावर चढलं कि दूसरा पाय बेडवर्...आता मला बेडवरून उतरण्यासाठी रडावं लागत नाहि...आता वॉशिंग मशिन तेवढं राहिलं होतं...कपडे धुताना धडधडणा-या मशिनमधे नेमकं काय असावं?...आज ठरवलंच होतं कि वॉशिंग मशिन सर करायचीच...आई पोळ्या करत होती.. हि चांगली संधी होती...ती मला कुठलं तरी गाणं शिकवत होती...मी हळूच पाठीमागुन सटकलो...मला फक्त वॉशिंग मशिन दिसत होती..बेडला चिकटवून ठेवलेली वॉशिंग मशिन...मी सगळ्या स्टेप मनात ठरवूनच ठेवल्या होत्या..पहिल्यांदा आईचं पुस्तकाचं कपाट पार करायला ह्वं होतं..आज योगायोगाने ते उघडं होतं...मी आतल्या पुस्तकाच्या ढिगावर उतरलो...आपली वेडछाप आई एवढी पुस्तकं कधी वाचते..?..मी पुस्तकाच्या ढिगावरून सरळ बेडवर चढलो....वॉशिंग मशिनपर्यंत पोहचलो खरा पण मशिनचं झाकण काही केल्या उघडेना...शेवट्चा प्रयत्न करावा म्ह्णून जोर लावला तर ते उघडलं गेलं...मग काय उतरलो सरळ मशिनमधे...आतमधे नाचुन बघितलं...बसून बघितल....पण या मशिनचे कपडे धुणारे हात कुठे दिसलेच नाहित...


'' बूब्बू...बूब्बू...कुठे आहेस तू? आवाज का देत नाहिस...बूब्बू..."

                            हा तर आईचा आवाज होता......आई पुरती घाबरली होती......कपाळावर ब-यापैकी घाम जमा झाला होता...मी सापड्ल्यावर मला जवळ घेण्यांत आलं...पटापटा मुके घेण्यात आले..

                           ''माझं ११ महिण्यांचं पोरंगं.. ..  नेहमीसारंखं त्याला किचनमध्ये घेऊन मी काम करत होते....हा माझ्या पाठीमागेच खेळ्त होता...आणि तव्यावरची पोळी परतेपर्यत नजर चुकली आणि हा गायब झाला...'' आई शेजारच्या काकूंना कौतुकाने सांगत होती...

                                ''आणि वॉशिंग मशिनमधे काय करत होतास रे लबाडा...?'' माझ्याकडे वळून तिने असं काय ऐटित प्रश्न विचारला जसं काय मी तिला उत्तर देणार होतो...

                              मग काय अंगवळणी पड्ल्यासारखं आमचं फोटोसेशन झालं...मग आम्हीही गड सर करून विजयी झालेल्या महाराजांसारख्या भरपूर पोजेस दिल्या.....असे माझे सगळेच पहिले क्षण आईने आपल्या डोळ्यांत आणि कॅमे-यात कैद केले आहेत....



                               थोड्क्यात काय अशी मस्त मस्त होती आमची वॉशिग मशिन यात्रा....!!!