शनिवार, १९ मार्च, २०११

राक्षसी वंश....??

                    ''सॉरी मि.समीर....आम्ही दोघांनाही वाचवू शकलो नाही''

                      काय सांगतोय हा डॉक्टर्...सफेद कोट घातला म्हणजे काय हाच ठरवणार का कोण किती जगणार्...मी आहे गं करूणा...का डोळे मिटलेस...आत्ता तर कुठे तुला बघायला लागलोय मी...असं नको करूस गं...करूणा...प्लिज मला सोडुन जाउ नकोस...मी नाही राहू शकत तूझ्याशिवाय...कुठे निघालीस तू..माझं बाळ.. नका घेउन जाउ त्याला....?

                  प्लीज करूणा...

                   माझ्या तोंडातून नकळत येणारी लाळ पुसायला कंटाळ्लीस का गं...?...एका झटक्यात एवढं मोठं शरीर आडवं झालं....चारी कोने चीत...शरीरंच आपलं राहिलं नाही तर लढणार कशाच्या बळावर...?..माझा अंहकार....माझ्यासारखाच स्वार्थी...लूळ्या पडलेल्या शरीराची पटकन साथ सोडून दिली...पण आता उपयोग काय...आता बोलताच येत नव्हतं...मनातलं तूला सांगताच येत नव्हतं...तूही काही बोलत नव्हतीस.. निर्विकार...तू अशी नव्ह्तीस कधी..केवढं बोलायचीस...माझं लक्ष नसायचं तेव्हा...पण आता तूझा एकच शब्द ऐकायला आसुसलोय गं मी...मी काय दिलं तूला..नुसतं दु:खं..मनःस्ताप...तू मात्र फक्त माझ्यासाठी जगत राहलीस...तूझ्या सुखाच्या आड आलो मी नेहमी...आणि तू मात्र सतत माझं सुख शोधत होतीस...

                 ''आपल्याला बाबा आता झेपत नाही...वय झालं..'' असं म्हणत आई गेली ती परत आलीच नाही...दादा तर दुरुनच उभं राहुन बघुन गेला... हाच सांगत होता गं महिण्यापूर्वी...''बायकोला जास्त डोक्यावर बसवु नकोस...पायातली वहाण पायातच बरी...'' त्याचीच री ओढत आई म्हणाली होती..''पाठीमागुन आलेलं कुत्रं ते...त्याला कुठं ठेवायचं ते तुझं तू बघ बाबा...''....पण त्यावेळी घडलं होतंही तसंच काहीतरी विचित्र...माझ्या स्वाभिमानाला ठेच पोहचवली होतीस तू...माझ्या अहंच्या फण्याला तूझा केविलवाणा चेहरा दिसलाच नाही...तू विणवण्या करत होतीस...''नको हो आपल्याला दूसरं मुल...मला खूप त्रास होतो हो...डॉ. नी काय सांगितलं लक्षात आहे ना...त्यापेक्षा आपण एखाद्या मुलाला दत्तक घेऊया ना...''

                  मी म्हणालो...'' पहिली मुलगी झालेय...दुसरा मुलगाच हवा...आणि दत्तक कशाला...आपण काय सालं वाझोंटे आहोत काय..?''

                 मी वाझोंटाच होतो गं...भावनेचा वाझोंटा....पैशाचा माज आला होता मला...तूही कमावयचीस...वास्तविक घरातलं सगळं तूच बघायचीस..मी मात्र त्या स्वार्थी भावाच्या घशात सगळं घालत राहिलो...तू एकदा जाणिवही करून दिलीस...पण मला वाट्लं तू आम्हां दोघां भावांना वेगळं करायला निघालीस..तूझा आणि पदरातल्या सईचाही मी विचार केला नाही...तू मात्र घर चालवलंस सगळं...कधी कुणाला काही कमी पडू दिलं नाहिस...सगळंच कसं जमायचं तूला...आज अंथरूणावर पडल्या पडल्या कौतुक वाटतंय तूझं...आज बोलायचं आहे गं तुझ्याशी...खूप बोलायचंय..मझा लॅपटॉप..क्रिकेटची मॅच...मित्र...सगळं सोडून फक्त तूझ्याशी बोलायचंय...आठवतंय मला...सई झाली तेव्हा तूला किती आनंद झाला होता...आईने तर मुलगी झाली म्ह्ट्ल्यावर बाळाचा चेहरा देखील पाहला नव्हता कित्येक दिवस...मी सुद्धा नाराजच होतो...पण सई तूझ्यासारखीच गोड...कधी ओढ लागली तीची कळलंच नाही...पण तरीही एक मुलगा हवा होता...वंश चालवायला कुणीतरी...तूही एकुलती एकच होतीस ना गं आपल्या आई बाबांची...तू माझा वंशच तर वाढवत होतीस...

                  मी तूला कधी समजूनच घेऊ शकलो नाही..तूझं बाळंतपण भलतं जड....कडक डोहाळे लागले होते तूला...सईच्या वेळी डॉ. नी सांगितलं होतं...पुन्हा चान्स घेऊ नका...पुढ्च्या वेळी कदाचित बाळ आणि आई दोघेही वाचणार नाहीत...पण मी तूझं कधीच ऐकलं नाही...त्या भयाण रात्री तूला झोपेचं औषध देऊन...तू कसलाही विरोध केला नाहीस..खरं तर तुझ्या विरोधाला मी कधी जुमानलंच नाही..कारण तू तो शुद्धीत असतानाही कधी केला नाहीस...तू का अशी होतीस...तूला जेव्हा कळलं की तू पुन्हा एकदा आई होणार आहेस...त्यादिवशी शेवटंचं बोललीस माझ्याशी...ते तूझे शब्द्...आजही रात्रीचं मला झोपू देत नाहीत...तू म्हणालीस...'' समीर हे तुम्ही योग्य केलं नाहीत..माझ्या मातृत्वाबरोबर खेळलात तुम्ही...मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही...'' त्यानंतर तू कधीच बोलली नाहीस...मी खचलो...त्यातच दादाने प्रॉपर्टीचे पेपर पाठवले...आता सगळं त्याचं होतं...पाठीत खंजिर खुपसला..स्वतःच्या सख्या भावानं..माझ्या नकळत....तूझ्या सख्या नव-यानं तूझ्या कुशीत खुपसला तसा..तूला नकळत...खरचं गं मी तूझा अपराधी आहे गं...

                   कामात लक्ष लागेना त्या दिवसापासुन...या सगळ्या विचारातच गाडीवरचा ताबा सुटला...आणि...डोळ्यांना काही दिसेना...शरीरात काहीतरी बिनसल्याची जाणीव....

                   ''मायनर पॅरालिसिस..'' डॉ. चे शब्द कानात घुमत राहिले...तू मात्र शांत होतीस...सई सारखं माझंही सगळं करायचीस...लहान बाळ झालो होतो ना मी तूझा....तूझं वाढतं पोट बघितलं की स्वतःच्या गुन्ह्याची जाणीव व्हायची...तूला प्रसव वेदना होत होत्या तेव्हा...बाहेर व्हीलचेअरवर बसुन अस्वस्थ वाटत होतं....मी तूला या वेदना दिल्या होत्या तूला नको असतानाही...मनातल्या मनात...प्रार्थना चालू होती...देवा सोड्व तीला...सगळ्या वेदंनातून सोडव माझ्या करूणेला....रक्षण कर तीचं...

                     आणि देवाने खरंच सोडवलं तूला सगळ्या वेदनांतून...तूझं रक्षण केलं माझ्यासारख्या राक्षसापासुन...पण आता माझा वंश कोण चालवणार....माझी बछडी...माझी सई...माझा वंश पुढे चालवणार....माझा वंश....

....माझा राक्षसी वंश...???



१६ टिप्पण्या:

गुरुनाथ म्हणाले...

वाचुन अंग शहारले, लेखन म्हणुन तटस्थपणे न पाहता यावं इतके उत्कॄष्ट लेखन ..... आवडले म्हणवत नाही पण भावले.

सारिका म्हणाले...

खूप खूप धन्यवाद गुरुनाथ...तुम्हांला भावलं हेच पुष्कळ आहे...

Deepak Parulekar म्हणाले...

मस्तच आहे! पण शेवटची लाईन नाय कळली ब्वॉ !!
त्या नालायक नवर्‍याचा राक्षसी वंशाचं खापर बिच्यार्‍या सईवर कशाला??
माहित नाही कदाचित मला समजली नसेल ते वाक्य!!
बाकी अगदी भावस्पर्शी !! :)

सारिका म्हणाले...

अरे दीपक....त्या नालायक नव-याला अशी भीती वाटतेय की त्याच्यातल्या राक्षसी गुणांचा वंश त्याची मुलगी चालवणार की काय...म्हणुन राक्षसी वंश...त्यात तिचा काहीच दोष नसणार..जसा त्याच्या बायकोचा काहीच दोष नव्हता...

बाकी प्रतिक्रियेबद्दल लई लई आभार...!!

Suhas Diwakar Zele म्हणाले...

ओहह्ह :(
एकदम हृदयस्पर्शी.

सारिका म्हणाले...

हे सुहास प्रतिक्रिया एकदम हृदयझेली...!! धन्यवाद...

सचिन उथळे-पाटील म्हणाले...

जबरदस्त. एकदम मनाची पकड घेणारे शब्द आणि तेवढेत मनाला भिडणारे.
वाचताना एकदम अस्वस्थ झालो होतो.

सारिका म्हणाले...

धन्यवाद सचिन...
मडंळ लई आभारी हाय तुमचं पाटीलसाहेब....

Unmesh म्हणाले...

hey pretty gud story!!!!

सारिका म्हणाले...

thnks unmesh...!!!

Anagha म्हणाले...

एकदम हृदयस्पर्शी!!

सारिका म्हणाले...

हे अनघा...तूझी प्रतिक्रिया वाचुन खूप आनंद झाला...तूझं माझ्या ब्लॉगवर स्वागत...!!!

प्रतिक्रियेसाठी खूप खूप आभार...!!

अनामित म्हणाले...

अस्वस्थ करून टाकणारी 'टचिंग' पोस्ट ... सुंदर लेखन...

सारिका म्हणाले...

खूप खूप आभार देवेन....!!!

Yogesh म्हणाले...

जबरदस्त लिहलय...वाचताना खुप अस्वस्थ झालो...मस्त..आवडल

सारिका म्हणाले...

प्रतिक्रियेसाठी खूप खूप आभार.....!!!!