बुधवार, १५ डिसेंबर, २०१०

उखळ..!!




''बांधुन ठेवलं ना तासभर..मग बोलशील पोपटासारखा...''

             मी माझ्या तीन वर्षाच्या मुलाचा अभ्यास घेत होते..तो रागाने माझ्याकडे पहायला लागला..

''रागाने काय बघतोस..?..चल आवर उशिर होतोय....स्कुल बस येईल इतक्यात..."

             त्याने रागा रागानेच बॅग भरली..डेरी मिल्कच्या अ‍ॅडमधली मुलगी पळून जाताना रडत रडत आपली बॅग भरते अगदि तश्शी..

               सोसायटीच्या गेटजवळ त्याची स्कुल बस येते .. हॉर्न वाजल्यावर मी त्याला खाली घेऊन येते..आपलं रडणं विसरुन तो आपल्या मित्र- मैत्रिणींच्या घोळ्क्यात शिरतो..बस वळेपर्यंत मी उभी राह्ते..स्वारी नी आमच्याकडे पाहिलंही नाही आज...माझा हात हवेतच राह्तो...जरा जास्तच रूड वागले मी त्याच्याशी...पण कृष्णाची आई सुद्धा त्याला उखळाला बांधुन ठेवत असे..ते त्याला चांगलं वळण लागावं म्हणुनच ना...?

                मी खिन्न मनाने घरी जायला वळणार इतक्यात आमच्या शेजारच्या वींगमधली आर्यनची आई हाक मारते..आर्यन माझ्या मुलाच्याच वर्गातला..तर त्याची आई मला कशी म्हणते, ''कशी झाली परीक्षा पार्थची? माझा आर्यन खूप हूशार आहे हो...सगळं बोलतो पोपटासारखा..ए टू झेड, वन टू टेन, संडे मंडे सुद्धा.." मी मनात म्हटलं..आमच्या कार्ट्याला अजुन गंध नाही लागला अभ्यासाचा...कसंनुसं हसत मी तीला म्हटलं, '' अहो लहान आहे आमचा पार्थ तुमच्या आर्यनपेक्षा..ते पण बरोबर आठ महिण्यांनी...शिकेल हळूहळू बोलायला..'' आता ती कसंनुसं हसली..माझ्याकडे रागाने बघत ती आपल्या घराकडे जायला लागली..तीची नजर जणू मला चिडवत होती...'कोल्ह्याला द्राक्षे आबंटच'...

              जळू मेली...असु दे म्हणूदे काहीतरी..लहान आहे हो माझं तीन वर्षाचं बाळ...शिकेल हळूहळू...
असा विचार करत करत मी घराच्या पाय-या चढत होते..इतक्यात आईचा फोन..

'' गेला का गं पिल्लू शाळेला?"

'' गेला गं बाई..आज किरकिर न करता गेलाय..''

''मारत जाऊ नको गं त्याला..करेल हळूहळू अभ्यास..''

'' अगं मी कुठे मारते त्याला..पण अभ्यास नको का करायला त्याने..थोडं तरी लक्ष हवं... नुस्ती मस्ती..."

'' असु दे गं..शिकेल हळूहळू...तू काय पोटातूनच शिकून आली नव्हतीस...''

'' बरं बरं ठेवते आता फोन..कामं बरीच आहेत मला..."
             
             फोन ठेवला खरं..पण विचार सुरू झाले..मी तरी कुठे पोटातून शिकून आले होते सगळं... हळू ह्ळूच शिकले सगळं..अभ्यासात लक्ष कधी नव्हतंच... नुस्त्या खोडया..आणि मग शिक्षकांनी केलेल्या शिक्षा..मग हळूहळू अक्षराची झालेली ती पुसट्शी ओळख..मैत्रिणीला आपल्यापेक्षा जास्त मिळालेले मार्क्स...किती उपयोगी पडले होते त्यावेळी...ही पुसट्शी ओळख ठळख व्हायला... सगळेच स्वतःची तुलना स्वतःबरोबर का करत नसतील?... नेहमी दुस-यांच्या चष्म्यातून जग बघायची ही आपली सवय कधी जाणार आहे..?

                  काल आपल्या पप्पासोबत 'दबंग' बघता बघता आपल्या पार्श्वभागावर हात ठेउन 'मुन्नी बदनाम..'नाचत होतं पोरगं तेव्हा आपल्याला केवढं कौतुक वाटलं होतं त्याचं..त्याच्या पप्पांनी त्याला उचलून घेतलं आणि त्याच्या गोब-या गालाचा एक मस्त पापा घेतला..मलाही असंचं काहीतरी करावसं वाटलं..पण दुस-याच क्षणी मी त्या दोघांना म्हटलं..
          
 ''चला बंद करा टि.व्ही. आता..अभ्यासाला बस रे आता..एबीसीडी येतं का...?... नाही..'मुन्नी बदनाम' बरं येतं बोलायला..''

             किती मनाच्या विरूद्ध वागले होते मी तेव्हा.. माझ्याच पोटच्या पोरासोबत..
विचांरासोबत माझं काम आणि घड्याळ दोन्हीही वेगाने पुढे सरकत होतं..पार्थची स्कूल बस परतण्याची वेळ झाली होती..मी माझं हातातलं काम आवरून सोसायटीच्या गेटजवळ जाऊन उभी राहीले...पाठीमागुन माझा पदर कुणीतरी खेचल्याची जाणीव होते मला..मी पाठी वळून बघते तर एक शेबंडं पोरगं माझा पदर खेचत असतं..कपडे फाटलेले, अंग कळकटलेलं..पण डोळ्यांत एक वेगळीच चमक..रस्त्याकडे बोट दाखवून काहीतरी दाखवत मला म्हणतं..

'' काकी बघा ना..मला आता एबीसीडी लिहायला यायला लागली..आता आई मला बांधून नाही ठेवणार ना..?

                   त्याच्या त्या निरागस प्रश्नावर काय प्रतिक्रीया देउ ते क्षणभर कळेना मला...त्याने बोट दाखवलेल्या दिशेने मी पाहत राहीले..त्या काळ्याशार डांबरी रस्त्यावर कुठुनश्या सापडलेल्या खडूने त्याने 'एबीसीडी' लिहिली होती..मला त्याचं एवढं कौतुक वाट्लं..त्याक्षणी त्याला उचलून घ्यावं आणि त्याच्या कळकटलेल्या शेबंड्या गालाचा एक मस्त पापा घ्यावा..पण मी त्याला हसुन एवढंच म्हटलं..

'' नाही रे बांधुन ठेवणार तुझी आई तुला.''

                  आताही मनाच्या विरूद्ध वागले होते मी..ते पोरगं हसत हसत आपल्या झोपडीकडे पळालं..आणि पार्थच्या स्कूलबसचा हॉर्न वाजला..मी तिकडे निघाले..

               रात्री स्वप्नात आई माझा अभ्यास घेत होती..आणि मी काळ्याशार डांबरी रस्त्यावर खडूने 'अ आ इ ई' लिहित होते..पण बोलता येत नव्हतं..एकही अक्षर ओळ्खता येतं नव्हतं..तेव्हा आईचा आवाज आला..

 '' उखळाला बांधुन ठेवलं ना तासभर..मग बोलशील पोपटासारखी...''
           
              पण हे सगळं सोडून मला एक प्रश्न विचारावासा वाटतो तो त्या कृष्णाला...


            ''हे कृष्णा, तू चमत्कारांचा राजा...मग हे उखळ गायब का करत नाहीस..?''



१५ टिप्पण्या:

Shivprasad Patil म्हणाले...

Very Nice...................
& '' काकी बघा ना..मला आता एबीसीडी लिहायला यायला लागली..आता आई मला बांधून नाही ठेवणार ना..?

Very Heart Touching

सारिका म्हणाले...

thanks shivprasad...

Deepak Parulekar म्हणाले...

सुंदर लेख!
कृष्णाने उखळ गायब केलें असतं तर त्या उखळाला इअतकी वॅल्यु नसती राहीली ना!
कृष्ण लहानपणापासुनच हुशार होता! माझ्यासारखा, :) हे हे हे!
ममाने माझं नाव कृष्ण का नाही ठेवलं?? मम्मी :(

सारिका म्हणाले...

हे हे हे दीपक..धन्यवाद...तूही कृष्णच आहेस..कलयुगातला कृष्ण्....बहुदा आईला तुझे पाय पाळण्यात दिसले नसावेत...

सचिन उथळे-पाटील म्हणाले...

मस्त ..... अप्रतिम

सारिका म्हणाले...

धन्यवाद..सचिन

Aniket म्हणाले...

mastach

सारिका म्हणाले...

dhansch Aniket..

आदित्य चंद्रशेखर म्हणाले...

सरिका तुम्हाला जे वाटतं तीच सगळ्या आयांची भावना आहे. माझी आई मला लहानपणी अधिकपणा करतो म्हणून मारायची आणि नंतर स्वत:च रडत बसायची! तेव्हा मी म्हणायचो की आता रडतेस तर मग मारतेस कशाला? तेव्हा तिच्या भावना समजत नव्हत्या, ते वयही नव्हतं म्हणा!आता कळतंय! फारच छान शब्दबद्ध केलंत तुम्ही!

सारिका म्हणाले...

धन्यवाद आदित्य...आता कळतंय.. हेही नसे थोडके..

Unknown म्हणाले...

सारिका मस्त आहे ''उखळ''.
तू इथे एक आई आणि मुलगा या मधील नात दाखवून दिलस. आई काय असते हे तुझ्या लिखाणात दिसून येतेय.
मला माझ बालपण आठवल.
जर '' उखळ '' कृष्णाने गायब केलं असतं तर यशोदेच कृष्णावर्ती प्रेम दिसलं नसत.
मला एवढच सांगायचं आहे '' स्वामी तिन्ही जगाचा '' '' आई विना भिकारी''
मला आवडल ............

सारिका म्हणाले...

धन्यवाद भरत्...खरं आहे तुझं..

अनामित म्हणाले...

Well, naturally speaking, studying is unnatural. 'School' education is a virtue of so called modern and civilized society. But children who show pure natural form hate to study and I guess, it is understandable. But unfortunately to survive in this world, manipulated by human, one needs to take conventional school education. I guess, parents should refrain from corporal punishments, comparisons and focus on making learning interesting. Coupling learning with entertainment may help. :)

अपर्णा म्हणाले...

ही या पोस्टवरची -ve प्रतिक्रिया समजली तरी चालेल पण फक्त तीन वर्षाच्या मुलाकडून मुळात अभ्यास करवून घेणे हेच जरा मला जास्त वाटतंय...अर्थात माझं पोरगं देशाबाहेर वाढतय म्हणून असेल कदाचित पण सध्या म्हणजे वयाच्या साडे तीन वर्षाचा असताना त्याचा अभ्यास म्हणजे हे सगळं नाहीये...
मला तरी तीन म्हणजे फार लवकर वाटतय..बाकी हेच सगळं नंतर थोडी सिरीयस शाळा सुरु झाली की हेच संभाषण होऊ शकत...

आणि मग ते कृष्णाच उखळीच उदा मस्त ....

सारिका म्हणाले...

धन्यवाद अपर्णा....खरं आहे तुझं...फक्त तीन वर्षाच्या मुलाकडून अभ्यास करवून घेणे हे जरा जास्तच आहे.....मलाही पटत नाहिच...पण एक आई म्हणुन जे काहि करते ते त्याच्या भल्यासाठीच....

बाकि प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभार...!!!