शनिवार, २२ जानेवारी, २०११

रांग..!!!



                 रांग हा शब्द काहि तुम्हांला आम्हांला नविन नाही...लहानपणी मला मुग्यांची रांग बघायला खूप आवडायचं...एकापाठोपाठ चालणा-या मुंग्या..त्यातल्या एकीलाही रांग सोडून दूसरीकडे जाण्याचा मोह होत नसावा बहुतेक्..किंवा तेव्ह्ढं धाड्स नसावं बहुदा...

                असो तर आपल्यापैकी रोज कुणीतरी कुठल्या ना कुठल्या रांगेत उभा असतो...तसचं मीही काल महाराष्ट्र राज्य विदयुत नियामक मंडळाच्या केद्रांवर आमच्या घराचं नेहमीसारखं जास्त आलेलं विद्युत देयक भरणा करण्यासाठी रांगेत उभी होते..अहो म्ह्णजे एम्.एस्.ई.बी. चं लाईट बील भरण्यासाठी रांगेत उभी होते..

               तर झालं काय..पुढे फक्त दोघेचजण..मनातल्या मनात आनंदाचा लाडू फुटला..आता आपलं काम लवकर होणार...पण ते माझ्या पुढचे दोघे जण हातात बरीचशी बीलं घेऊन उभे होते..पहिल्याच्या हातात १० बीलं तर दुस-याच्या हातात ७ बीलं...मनातला लाडू पोटात जाण्याआधीच घशात अडकला...

               शेजा-याची मदत करणं हा चांगला गुण आहे पण एकदम १० जणांची बिलं भरायला आणायची..माझ्या डोक्यावरच्या उन्हाबरोबर माझ्या पाठची रांगही वाढायला लागली..आणि माझा आधीच तापलेला पारा त्यांच्या हातातली बीलं बघुन अजुनच चढला..मी आधी थोडं नरमाईने घ्यायचं ठरवलं..रांगेतल्या पुढ्च्या गृहस्थाना म्ह्ट्लं..

''एवढी बीलं तुमची आहेत का...काका..?" (शेवटच्या काका शब्दावर जरा जास्त जोर..)

काका म्हटल्यावर ते गृहस्थ माझ्याकडे एकदम रागाने बघत म्हणाले..

''शेजा-यांची आहेत..''

''मग तुम्ही का आलात भरायला..?'' (माझा आपला वेड पांघरून पेडगावला जाण्यासारखा निरागस प्रश्न..)

''त्यांना वेळ नव्हता..'' (तेवढंच उद्धट उत्तर...)

''तुमच्याकडे भरपुर वेळ आहे वाटतं..?'' (अतिउद्धट प्रश्न..)

''तुम्हांला काय करायचं आहे..?" (आता खरोखर काका रागावले..)

''अरे तुमच्याकडे भरपुर वेळ असेल..शेजा-यांची बीलं भरायला...मला पण बील भरायचं आहे..ते पण फक्त स्वतःच्या घरचं...'' (माझ्या सरळसोट उत्तराला घाबरले असावे बहुतेक...)

''मग मी काय इथे माश्या मारायला उभा राहिलोय..?'' (माझ्या गैरसमजाचा अक्षरशः फडशा..)

''मग एक बील भरा आणि पुन्हा रांगेत जा पाठिमागे...आणि मारा तुमच्या माशा..म्ह्णजे शेजां-याची बीलं भरा...'' (आता जरा जास्त मोठा आवाज....अहं दुखावला ना माझा...)

               मला मनातल्या मनात शिव्या घालत एक बील भरून शेजारधर्म निभावणारे काका परत रांगेत जाउन उभे राहीले..मी मात्र रांगेतल्या लोकांच्या कौतुकाच्या नजरा पाठीवर झेलत पुढे सरसावले...लोकं पुटपुटत होती...

'' बरं झालं..असंच पाहिजे..प्रामाणिकपणाच्या शाळा उघडल्या पाहिजे आता...सगळे मेले घुसखोर..''

               मला या कल्पनेची गमंतच वाटली...प्रामाणिकपणाच्या शाळा..खरंच असा प्रामाणिकपणा शिकवून येईल का कुणाला... शाळेतुन बाहेर पडणा-या मुलाचा निकाल कसा असेल..७०% प्रामाणिकपणा...किंवा नापास विद्यार्थी... अप्रामाणिक...

               असा टक्क्यावर नसतो प्रामाणिकपणा..एकतर तो असतो किंवा नसतो..पण लोकं स्वतःच्या मनाशी तरी प्रामाणिक असतात का? चुकीचं वागताना त्यांचं मन त्यांना डाफरत नसावं बहुतेक...

               बीलं भरून घरी निघाले तर सोसायटीतले नुकतेच निवृत्त झालेले काका भेटले...यांच्यासमोर सतत एकच प्रश्न असतो..वेळ कसा घालवावा...मला रस्त्यातच गाठुन माझ्याशी बदलत्या वातावरणावर चर्चा करायला लागले...

               रांगेत उभं राहून आपला वेळ वाया जाउ नये म्हणुन धडपड करणारी माणसं एका बाजुला..आणि आपला वेळ जात नाही म्हणून रस्त्यात उभं करून तासन् तास वायफळ विषयावर गप्पा मारणारी माणसं एका बाजुला...दोघांचीही संगत वाईट..एक आपली मनशांती खाणार..आणि दुसरा आपला वेळ खाणार...

संध्याकाळी हा सगळा किस्सा नव-याला सांगितला तर त्याचं काहितरी तिसरंच मत...

'' नाहीतरी तुला कुणाशीतरी भांडायचंच असतं..आज मी नाहीतर तो रांगेतला माणुस सापडला तुझ्या कचाट्यात...बिच्चारा...''

''अरे पण तो चुकीचंच वागत होता नाही का?"

''हो गं माझे राणी तो चुकीचंच वागत होता...पण तू का आपली एनर्जी वाया घालवतेस..? जस्ट कुल...''

''अरे असं कसं ..दुपारच्या कडक उन्हात तुझ्या अंगावर कुणीतरी गरम पाणी ओतत असेल तर आपण मात्र फ्रिजमध्ये आहोत अशी कल्पना करुन गप्प राहायचं...मला तर हा तुझा कुल ऑप्शन पक्का फुल वाटतो बुवा...''

''कसले शब्दाचे खेळ खेळतेस..तुझ्या या छोट्या छोट्या गोष्टी सोड..माझ्यासमोर एक मोठा प्रश्न आहे सध्या..''

''आता काय नविन उपद्व्याप केलास बाबा...?''

''आपल्या नविन घराची डिल बारगळली गं...अगं तो घरमालक चक्क १० लाख ब्लॅक मनी मागतोय...''

''हे ब्लॅक मनी कुठल्या शेतात उगवतं रे बाबा..?''

''तूला ब्लॅक मनी माहित नाही..तू नक्की सरकारी खात्यातच नोकरीला आहेस ना..?''

''अरे माझ्या सोन्या...खरंच माहीत नाही रे..''

''अगं ब्लॅक मनी म्हणजे पोहच पावती शिवाय जे पैसे पोहचते केले जातात ते..थोडक्यात जगाला अंधारात ठेउन दिलेले पैसे..तुझ्या सरकारी भाषेत 'टेबलाखालुन दिलेले पैसे..'...''

''ओके ओके..पण मग त्याला एवढे ब्लॅक मनी द्यायला कुणाला परवडेल...?...मला वाटत नाही त्याचा फ्लॅट विकला जाईल...''

''तुझं नाव मंदाकिनी ठेवायला हवं होतं तुझ्या आई-वडिलांनी...मंदच आहेस तू...रांग लागलेय त्याचा फ्लॅट घेण्यासाठी...''

             मी मख्खपणे त्याच्याकडे पाहत राहते..त्याच्या डोळ्यात दोन भाव एकत्र दिसतात मला..एक चीड आणि दुसरी हतबलता...दोघीचांही त्याच्या मनात गोंधळ चालला असावा..चीड कशाची तर आपल्याकडे ब्लॅक मनी द्यायला मनीच नसल्याची...आणि हतबलता कशाची तर असे अंधारात पैसे देण्याच्या विरुद्ध असणा-या संस्कांराची...

त्याचे शब्द कानात घुमत राहिले..

''रांग लागलेय त्याचा फ्लॅट घेण्यासाठी..''

                खरं सांगू तर या रांगाच चुकीच्या...वरवर वेगळ्या दिसणा-या पण आतुन फक्त दोनच प्रकारच्या...प्रामाणिकपणा असणा-यांच्या आणि प्रामाणिकपणा नसणा-यांच्या...आपण कुठे उभं राहायचं ते आपणच ठरवायचं...

नाहितर सरळ सरळ मुंग्यासारंखं वागायचं ..पुढचा चाललाय ना त्याच्या मागे चालत राहायचं...

पण कमीत कमी मेंदू असणारा आणि विचार करता येण्यासारख्या माणसाला 'माणुस' या स्वतःच्या नावाला तरी जागलं पाहिजे...

शेवटी निवडलेली रांग कोणती ते महत्वाचं...!!!











१० टिप्पण्या:

unmesh म्हणाले...

hey...ekdam mast vishay hota...awsm...keep posting

सारिका म्हणाले...

thanks unmesh...keep reading dear...

Deepak Parulekar म्हणाले...

आवडली रांग! मला पण जाम कंटाळा येतो रांगेचा. म्हणुन मी सगळी बीलं ऑनलाईन भरतो !
टीव टीव :)
Joke apart, really nice thoughts with routine examples..
Liked it...
Well, keep posting the posts which are in queue....:)

सारिका म्हणाले...

धन्यवाद..दीपक..!

तुझ्यासारखं सगळ्यांना ऑफिसमधे फुकट नेट वापरता येत नाही...ऑनलाईन बीलं भरायला...

असो...प्रतिक्रियेबद्द्ल पुन्हा एकदा धन्यवाद...!!

तुझा निशिगंध कधी पूर्ण करणार आहेस?

sandeep म्हणाले...

हाय सारिका

तुझं रांग पुराण छान आहे ? सध्या सगळी कडेच असेच रांगेवरून खटके उडत असतात . टेलिफोन बिल असो की लाईट बिल असो . मला तर रांगेत उभं राहण्याचा भारी कंटाळा आहे . मनात फार दिवसांपासून ह्या रांगेत उभे राहण्या वरून फार संताप होता. तु ह्या प्रकरणाला फोकस केलेस बरं झालं

मुलांचा अभ्यास घेणं हे एक कौशल्याच काम आहे. त्यात स्वत:वर संयम असणं फार आवश्यक आहे. बर्‍याच वेळा एखादा विषय तासभर शिकवून सुध्दा शेवटी उजळणी घेतांना मुलं साफ सगळं विसरतात तेव्हा संताप येणं स्वाभाविक आहे. शिकवण्याच्या व अभ्यास घेण्याच्या पध्दतीत मुलांना सोपे होइल असे बदल करणे . फार धाक वा जबरदस्ती ने मुलांचा अभ्यास घेतला तर तो त्यांच्या लक्षात राहत नाही . कुण्या एकट्या मुलाचा अभ्यास घेण्या एवजी दोन तीन मुलांचा मिळुन शक्यतो त्याच्या मित्रांसोबत अभ्यास घेतला तर त्यांच्या लक्षात राहतो. मुलाचे कॉलनीतील इतर मित्र जर खेळत असतील आणि आपन लेकराला घेउन त्याचा अभ्यास घेत असु तर तो कधिही मनापासून अभ्यास करणार नाही . त्याच लक्ष बाहेरच जाईल . हा विषय बराच गहण आहे . विस्तार भयास्तव मी फार काही लिहीत नाही . मी एक शिक्षक आहे त्या दृष्टीने माझे मत मांडले

मुलांचा बौध्दीक स्तर व अभ्यासातील प्रगती साठी गणपती स्तोत्र व मारूती स्तोत्र अवश्य शिकवावे व अभ्यासा अगोदर पाठ म्हनून घ्यावे

अभ्यासात नक्की फरक पडेल

सारिका म्हणाले...

dhanyawad sandeep...!

Suhas Diwakar Zele म्हणाले...

लैई भारी...आपण फार टरकतो लाइनला..
खास करून कॅंटीनच्या जेवणाची रांग :)
मस्त पोस्ट :)

सारिका म्हणाले...

हे हे हे...

धन्यवाद सु झे..!

पोटात प्रचंड भूक आणि पुढे न सरकणारी रांग...

मलाही या जेवणाच्या रांगेचा कंटाळा येतो..!!

अनामित म्हणाले...

खरच ह्या रांगा कधीकधी खूप डोक्यात जातात ...छान लिहल आहेस....

सारिका म्हणाले...

रांगा डोक्यात जातात...आणि डोकं कधी रांगेत शांत उभं राह्त नाही...

लई लई आभार...