गुरुवार, १८ नोव्हेंबर, २०१०

कथा डायरीची (१)

बायको:
१२.०३.२००४

                 आजची सकाळ मस्त होती...ब-याच दिवसांनी आज प्रसन्न वाटतं होतं..पप्पांची नुसती घाई चालली होती सकाळपासुन...त्यांचे कोणी मित्र येणार होते घरी त्यांना भेटायला..पप्पांचं हे नेहमीचंच...कुणी येणार म्हटलं कि,  सगळं घर स्वच्छ करत सुटतात....मी मात्र आपल्याच धुंदीत होते...सकाळी उशिरा उठले..निवांत ब्रश केला..सकाळचे सगळे विधी आटपल्यानंतर नेहमीसारखी खिडकीत जाऊन उभी राहिले...आज आभाळ अगदी स्वच्छ होतं..मनातले सगळे गोधंळ दूर झाल्यानंतर मन स्वच्छ होतं तसं..तोपर्यंत आईने हाक मारली..."जरा कांदा चिरून देतेस का गं?"...आईचा प्रश्न म्हणजे आदेशच असतो मुळी.. वैतागत मी म्हटलं,'' कशाला?''
               ''अगं, पोहे करायला हवेत..केवढी कामं पडली आहेत बघते आहेस ना तु..मला मेलीला एकटीला करावं लागतं सगळं.." आईचं पुराण कांदा चिरून दिल्याशिवाय संपणार नव्हतं......मी नाईलाजास्तव कांदा चिरायला बसले..आईची बडबड अखंड चालू होती..
             .''नव-याच्या घरी गेल्यावर अशीच वागणार आहेस का? शेण घालतील सासरची मंडळी आमच्या तोडांत...." तिची निरर्थक बडबड ऐकणं भाग आहे... माझ्या आयुष्याचा..(अशा वेळी माझे कान कसे बंद करायचे ते बरोबर कळतं मला)...तोपर्यंत पप्पांचे मित्र आले...त्यांच्या सोबत एक उंच मुलगा..जरा जास्तच उंच..डोळ्यांना चष्मा..चेह-यावर भरपूर पिंपल्स (तारूण्यपिटिका)..कपडे ठिकठाक...बिल्कुल आत्मविश्वास नाही...एकुण काय जरा विचित्रच ध्यान होतं....मी आतुन त्याचं निरीक्षण करत होते...बरंचसं निरीक्षण झाल्यावर मी माझं काम करायला लागले..
               तेवढयात पप्पांनी आवाज दिला..''रुचा, जरा बाहेर येतेस का?" असं सगळ्यांसमोर माझं नाव घेतलेलं मला आवडत नाही..असो..मी बाहेर येत नाही असं बघुन पप्पा म्हणाले, '' अगं बाहेर येतेस का जरा..तुझी ओळख करुन देतो''....पप्पा पण कधी कधी अतीच करतात...सगळ्यांना काय ओळख करुन दयायची...मी वैतागत बाहेर आले..पप्पांनी ओळख करुन दिली..''हे माझे मित्र..अनिकेत पुरानिक..आम्ही एकत्र शाळेत होतो.."
               मला पाहुन मात्र या काकांचा चेहरा पडला..मी उसनं हासू चेह-यावर आणलं... ते ही औपचारीकपणे हसले.. मग पप्पांनी त्याची ओळख करुन दिली..मी त्याचं नाव ऐकण्यासाठी उत्सुक होते..''हा गौरव जोशी..इंजिनिअर आहे..चांगल्या ठिकाणी जॉब आहे..तुलाही जॉबसाठी मदत करेल''
    ...असंच काहितरी सर्वत्र गवतासारखं पसरलेलं 'जोशी' आडनाव असावं याचं...हा माझा अंदाज खरा ठरला...मी त्याच्याकडे पाहत नव्हते...तो वेडा मात्र आल्यापासुन सतत माझ्याकडे पाहत होता..आपण कुठेही पाहत असलो तरी आपल्याकडे कुणीतरी पाहतंय, हे तरुण मुलींना बरोबर समजतं..असल्या नजरांची सवयच असते आम्हाला!...ते काका आपल्या भाच्याच्या कानात काहितरी कुजबुजले...
             थोडया वेळाने त्या वेडयाने मला विचारलं, "तुमची उंची किती आहे?" ...बावळटच आहे जरा हा...स्वतः उंच आहे म्हणुन सगळ्यांना त्यांची उंची विचारुन चिडवतोय कि काय हा..? मी विचारलं का, कि तु कोणती क्रिम लावुन ह्या एवढया तारुण्यपिटिका उगवल्यास त्या?......त्याची थोडीशी मस्करी करायची म्ह्णुन मी हळुच म्हटलं, ''एकशे त्रेपन्न सेंटिमिटर..''    बस म्हणावं आता हिशोब करत......तो थोडासा गोंधळला..पण लगेच त्याच्या चेह-यावरचे भाव पुर्ववत झाले...मग आईने सगळ्यांना पोहे दिले..पोहे मस्त झाले होते...तो गोंधळ्या अजुनही माझ्याचकडे पाहत होता..
                 त्याच्या मामांनी ''आम्ही निघतो'' म्हटलं आणि त्याच्याकडे पाहिलं, तर हा ढिम्म..जागचा हलेना...सगळं विसरल्यासारखा एकाच जागी बसुन होता..मंदच आहे वाटतं..मामानी पुन्हा एकदा आवाज दिल्यावर तो उठला..
               मी आणि पप्पा त्यांना सोडायला खाली बसस्टॉप पर्यत गेलो...परत घरी येताना पप्पांनी विचारलं, ''कसा वाटला मुलगा?'' मी मनात म्हटलं, '' सॅम्पल आहे.." मी गप्प आहे हे बघुन पुन्हा एकदा त्यांनी मला विचारलं, ''कसा वाटला गं मुलगा?''... मी म्हटलं,'' ठिक आहे, जरा जास्तच उंच आहे.." थोडा वेळ शांत राहिल्यानंतर पप्पा म्हणाले, ''तुला बघायला आले होते..ते लोक"...
               अरे कमालच आहे या लोकांची...मी काय प्राणीसंग्रहालयातला प्राणी आहे, मला बघायला यायला..
              मी म्ह्टलं, '' मला बघायला..कशाला?"
             पप्पा म्हणाले, ''अगं लग्न नको करायला तुझं..आयुष्यभर अशीच राहणार आहेस का?"
             मी म्ह्टलं, ''सांड दिसतो तो मुलगा..मला काहि पसंत नाही..मला मुळी लग्नच करायचं नाही..''
               एवढया लवकर लग्न वगैरे करण्याच्या भानगडीत पडणार नाही मी...मला लगेच ती पान परागची जाहिरात आठवली..मुलगी म्हणते..''शादी और तुमसे..कभी नहीं..." तसं मलाही म्हणावसं वाटलं '' लग्न आणि त्या सॅम्पल बरोबर ..कधीच नाही.."
                                                                                                                             (क्रमशः)

४ टिप्पण्या:

Deepak Parulekar म्हणाले...

हे हे हे छान !! पुढचा भाग लवकर !!

सारिका म्हणाले...

दीपकः धन्यवाद...पुढचा भाग..पुढच्या आठवडयात...

सचिन उथळे-पाटील म्हणाले...

"लग्न आणि त्या सॅम्पल बरोबर ..कधीच नाही....."


अरेरे .......... बिचारा(सांड).

सारिका म्हणाले...

स पा: लग्न न करावसं वाटणा-या प्रत्येक मुलीला बघायला येणारा मुलगा सांडच वाटतो..